सांगरुळ / वार्ताहर
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे नामदेव सणगर (वय ६५) या शेतकऱ्याचा हात पाय बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वतःच्या विहीरीत मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती नूसार मयत नामदेव सणगर हे शनिवारी रात्री ११ वाजता शेताला पाणी पाजून येतो असं सांगून घरातून बाहेर पडले. त्यांचे पूतणे नागेश सणगर ही शेताला पाणी पाजण्यासाठी रात्री शेतावर आले होते. विहीरीवर मोटार सूरु करत असताना मयत नामदेव सणगर हे पाण्यावर तरंगत असल़ेले पुतणे नागेश यांच्या निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी तात्काळ त्यांचा मुलगा मनोहर सणगर याला कळवले. त्यानंतर गावकामगार पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार यांनाही माहिती दिली. पोलीस पाटील कुंभार यानी घटनास्थळी माहिती घेवून करवीर पोलिस ठाण्यात वर्दी दिली.
सकाळी पहाटे करवीर पोलीस आपला फौजफाटा घेवून घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यावेळी त्यांचे दोन्ही पाय व डावा हात साडीच्या दोरीच्या सहाय्याने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.
तपास करणेसाठी पोलीस प्रशासनाकडून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पण श्वान त्यांच्या घरी जाऊन घुटमळले. सदरचा पंचनामा गावकामगार पोलीस पाटील व पंच यांचे समवेत करून मृतदेह शवविच्छेदन करणेसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल. करवीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निवास पोवार तपास करत आहेत.