देवगड : प्रतिनिधी
देवगड तालुक्यामध्ये बेपत्ता असलेल्या दोन महिलांचे मृतदेह रविवारी सकाळी आढळून आले आहेत. तालुक्यातील बापर्डे येथील ५५ वर्षीय प्रतिभा प्रकाश दुसनकर गेल्या १५ दिवसापासून बेपत्ता होत्या. बिघडलेल्या मनःस्थितीत त्या घरातून निघून गेल्या होत्या. या महिलेचा सडलेल्या स्थितीत सकाळी बापर्डे डोकांबा ओहोळात मृतदेह सापडला. तर, टेंबवली येथील प्रतिभा प्रदीप बापार्डेकर वय ५० ही महिला शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कामासाठी म्हणून घरातून बाहेर गेली होती. सायंकाळ झाली तरी ती घरी आली नाही. तिचा मुलगा तुषार प्रदीप बापार्डेकर यांनी आईचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही. रविवारी सकाळी नातेवाईकांनी शोध घेतला. तरीही न मिळाल्याने देवगड पोलिस स्थानकामध्ये आई बेपत्ता झाल्याची खबर देण्यासाठी मुलगा तुषार गेला होता. दरम्यान , माजी नगरसेवक उमेश कणेरकर यांनी मळई खाडीत एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी तात्काळ गेले. याचदरम्यान खबर देण्यासाठी आलेल्या तुषार बापार्डेकर याना बोलावून घेऊन मृतदेह पाहण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी मृतदेह आपल्या आईचा असल्याचे सांगितले. दोन्ही घटनेतील मृतदेहाचे पंचनामे करण्यात आले आहेत अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.









