धनंजय डिसिल्वा : शतकासमीप, अँजेलो मॅथ्यूज : अर्धशतक
वृत्तसंस्था/ गॅले
पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आला असून उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील येथे रविवारपासून सुरु झालेल्या पहिल्या सामन्यात दिवसाअखेर यजमान लंकेने पहिल्या डावात 6 बाद 242 धावा जमविल्या होत्या. धनंजय डी सिल्वा 94 धावांवर खेळत आहे. पावसामुळे पहिल्या दिवशीचा बराच खेळ वाया गेला.
या पहिल्या कसोटीत लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ढगाळ वातावरणाचा पाकच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उठविला. त्यांचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने लंकेचे पहिले 3 फलंदाज केवळ 53 धावात बाद केले. डावाला प्रारंभ झाल्यानंतर तिसऱ्या षटकात शाहीन आफ्रिदीने सलामीच्या मधुष्काला 4 धावावर झेलबाद केले. त्यानंतर शाहीन आफ्रिदीने कुसल मेंडिसला 12 धावावर तंबूत धाडले. कर्णधार करुणारत्ने सावध फलंदाजी करीत होता. पण शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर तो सर्फराज अहमदकरवी झेलबाद झाला. करुणारत्नेने 43 चेंडूत 6 चौकारांसह 29 धावा जमविल्या. उपाहारापूर्वी लंकेने आणखी एक फलंदाज गमाविला. नसीम शाहने चंडिमलला एका धावेवर बाबर आझमकरवी झेलबाद केले. उपाहारावेळी लंकेची स्थिती 19 षटकात 4 बाद 65 अशी होती.

मॅथ्यूज आणि धनंजय डी सिल्वा यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरला या जोडीने पाचव्या गड्यासाठी 131 धावांची महत्त्वपूर्ण शतकी भागिदारी केल्याने लंकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. या जोडीने शतकी भागिदारी 174 चेंडूत झळकवली. मॅथ्यूजने 109 चेंडूत 9 चौकारांसह 64 धावा जमविल्या. चहापानापूर्वी मॅथ्यूज अब्रार अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. चहापानावेळी लंकेची स्थिती 48.1 षटकात 5 बाद 185 अशी होती.
खेळाच्या शेवटच्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर लंकेचे द्विशतक 51.2 षटकात फलकावर लागले. संघाची धावसंख्या 5 बाद 226 असताना पुन्हा पावसाला प्रारंभ झाल्याने खेळ थांबवावा लागला. धनंजय डिसिल्वाने आपले अर्धशतक 89 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. तसेच त्याने समरविक्रमासमवेत सहाव्या गड्यासाठी 57 धावांची भागिदारी केली. आगा सलमानने समरविक्रमाला झेलबाद केले. त्याने 57 चेंडूत 5 चौकारांसह 36 धावा जमविल्या. समरविक्रमा बाद झाल्यानंतर पावसामुळे पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ थांबविला. त्यावेळी धनंजय डी सिल्वा 157 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 94 धावांवर खेळत आहे. पाकतर्फे शाहीन आफ्रिदीने 3 तर नसिम शाह, अब्रार अहमद आणि आगा सलमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव 65.4 षटकात 6 बाद 242 (मधुष्का 4, करुणारत्ने 29, कुशल मेंडीस 12, मॅथ्यूज 64, चंडिमल 1, समरविक्रमा 36, धनंजय डी सिल्वा खेळत आहे 94, अवांतर 2, शाहीन आफ्रिदी 3 – 63, नसिम शाह 1 – 66, अब्रार अहमद 1 – 59, आगा सलमान 1 – 18).









