लंका प. डाव 280, बांगलादेश प. डाव 3 बाद 32
वृत्तसंस्था/ सिल्हेत
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत कर्णधार धनंजय डिसिल्वा आणि कमिंदू मेंडिस यांच्या शानदार शतकामुळे लंकेने पहिल्या डावात 280 धावा जमविल्या. त्यानंतर दिवसअखेर बांगलादेशची पहिल्या डावात स्थिती 3 बाद 32 अशी केविलवाणी झाली आहे. कसोटीतील पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला असून एकूण 13 बळी नोंदवले गेले.
या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव कोलमडला. त्यांचा निम्मा संघ 57 धावात तंबूत परतला होता. त्यानंतर धनंजय डिसिल्वा आणि कमिंदू मेंडिस यांनी सहाव्या गड्यासाठी 202 धावांची द्विशतकी भागीदारी केल्याने लंकेला 280 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार धनंजय डिसिल्वाने 131 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 102 तर कमिंदू मेंडिसने 127 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांसह 102 धावा झळकवल्या. लंकेच्या इतर फलंदाजांना 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. करुणारत्नेने 1 चौकारांसह 17, कुशल मेंडिसने 2 चौकारांसह 16, चंडिमलने 9, रजिताने नाबाद 6, विश्वा फर्नांडोने 9 धावा केल्या. बांगलादेशतर्फे खलिद अहमद आणि नाहिद राणा हे प्रभावी गोलंदाज ठरले. खलिद अहमदने 72 धावांत 3 तर नाहीद राणाने 87 धावात 3 गडी बाद केले. शोरीफुल इस्लाम आणि ताजुल इस्लाम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लंकेचे दोन फलंदाज धावचित झाले. लंकेने उपाहारापर्यंत 22 षटकात 5 बाद 92 धावा जमवल्या होत्या. चहापानावेळी लंकेची स्थिती 49 षटकाअखेर 5 बाद 217 अशी होती. डिसिल्वाने 127 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह तर मेंडिसने 126 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांसह आपले शतक झळकवले. चहापानानंतर लंकेचा पहिला डाव 68 षटकात 280 धावांवर आटोपला.
यजमान बांगलादेशची डावाला डळमळीत सुरुवात झाली. विश्वा फर्नांडो आणि रजिता यांच्या स्विंग गोलंदाजीसमोर बांगलादेशचे 3 फलंदाज 10 षटकात 32 धावांत तंबूत परतले. फर्नांडोने डावातील तिसऱ्याच षटकात सलामीच्या झाकीर हसनला पायचित केले. त्याने 2 चौकारांसह 9 धावा जमवल्या. त्यानंतर फर्नांडोने बांगलादेशला आणखी एक धक्का देताना कर्णधार नजमुल हुसेन शांतोला 5 धावावर पायचित केले. पहिल्या दिवशीचा खेळ थांबण्यापूर्वी रजिताने बांगलादेशच्या मोमीनूल हकला मेंडिसकरवी झेलबाद केले. त्याने 5 धावा जमवल्या. मेहमुदुल हसन जॉय 9 धावावर खेळत आहे. लंकेतर्फे विश्वा फर्नांडोने 9 धावात 2 तर रजिताने 20 धावात एक गडी बाद केला. बांगलादेशचा संघ 248 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे असल्याने या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी लंकेने आपले वर्चस्व राखले आहे.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव 68 षटकात सर्वबाद 280 (धनंजय डिसिल्वा 102, कमिंदू मेंडिस 102, करुणारत्ने 17, कुशल मेंडिस 16, अवांतर 11, खलिद अहमद 3-72, नाहीद राणा 3-87, एस. इस्लाम 1-59, टी. इस्लाम 1-31), बांगलादेश प. डाव 10 षटकात 3 बाद 32 (मेहमुदुल हसन जॉय खेळत आहे 9, झाकीर हसन 9, शांतो 5, मोमीनूल हक 5, टी. इस्लाम खेळत आहे 0, अवांतर 4, विश्वा फर्नांडो 2-9, रजिता 1-20).









