बवूमाला पाकविरुद्धची कसोटी मालिका हुकणार!
वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि फलंदाज क्विनटॉन डी कॉक याने यापूर्वी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता पण त्याने हा निर्णय मागे घेतल्याने त्याचे पाक दौऱ्यात होणाऱ्या वनडे संघामध्ये पुनरागमन झाले आहे. कर्णधार टेंबा बवूमा दुखापतीच्या समस्येमुळे तो पाक दौऱ्यातील कसोटी मालिकेत उपलब्ध होऊ शकणार नाही.
दक्षिण ऑफ्रिकेचा संघ पाकच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. ही कसोटी मालिका 12 ते 24 ऑक्टोबर दरम्यान होणार असून या मालिकेतील सामने लाहोर आणि रावळपिंडी येथे होतील. सलामीचा फलंदाज डी कॉकने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2024 साली खेळला होता. 2024 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बाबार्डोस येथे झालेल्या सामन्यात डी कॉकने द. आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले होते. डावखुऱ्या डी कॉकने 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे द. आफ्रिकेचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी डी कॉकला टी-20 संघामध्ये स्थान दिले नव्हते. दरम्यान डी कॉकने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आणि त्याने द. आफ्रिकेचे विद्यमान प्रमुख प्रशिक्षक कोनार्ड यांच्याशी चर्चा करुन आपला निर्णय कळविला. त्यानंतर त्यांनी पाकच्या दौऱ्यासाठी डी कॉकचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला. डी कॉकने आतापर्यंत 155 वनडे सामन्यात 6770 धावा 45.74 धावांच्या सरासरीने नोंदविल्या आहेत. तसेच त्याने 92 टी-20 सामन्यात 2584 धावा जमविल्या आहेत.
बवूमाला कसोटी मालिका हुकणार
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार बवूमा याला इंग्लंडच्या दौऱ्यात स्नायु दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व अॅडेन मारक्रेमकडे सोपविण्यात आले आहे.
द. आफ्रिका कसोटी संघ: मारक्रेम (कर्णधार), बेडींगहॅम, बॉश्च, ब्रिव्हेस, झॉर्झी, हमझा, हार्मेर, जेन्सन, केशव महाराज, मुल्डेर, मुथूसॅमी, रबाडा, रिक्लेटोन, स्टब्ज, पी. सुब्dरायन आणि कायली व्हेरेनी.
द. आफ्रिका टी-20 संघ: डेव्हीड मिलर (कर्णधार), बॉश्च, ब्रिव्हेस, बर्गर, कोझी, डी कॉक, डोनोव्हेन फरेरा, रेझा हेन्ड्रीक्स, जॉर्ज लिनेडी, मापेका, एन्गिडी, पीटर, प्रेटोरियस, सिमेलेनी आणि लिझाद विलियम्स
द. आफ्रिका वनडे संघ: मॅथ्यु ब्रिझेकी (कर्णधार), बॉश्च, ब्रिव्हेस, बर्गर, कोझी, डी कॉक, झोर्झी, डोनेव्हेन फरेरा, फॉर्च्युन, लिनेडी, मापेका, एन्गिडी, पीटर, प्रेटोरियस आणि क्वेशीले.
नामीबिया विरुद्ध टी-20 मालिकेसाठी द.आफ्रिका संघ: डोनोव्हेन फरेरा (कर्णधार), बर्गर, कोझी, डी कॉक, फॉर्च्युन, हेन्ड्रीक्स, हर्मन, मापेका, मूनसॅमी, पीटर, प्रेटोरियस, सिमेलेनी, स्मिथ आणि विलियम्स.









