भाजप खासदारांना ढकलून पाडल्याचा राहुल गांधी यांच्यावर आरोप, आंबेडकर वादाला गंभीर वळण
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत केलेल्या विधानांवरून निर्माण झालेल्या वादाला गुरुवारी गंभीर वळण लागले आहे. संसद सदनाच्या प्रवेशद्वाराबाहेर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये या मुद्द्यावर जोरदार धुमश्चक्री झाली. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपच्या दोन खासदारांना ढकलून पाडविल्याचा आरोप करण्यात आला असून या पक्षाने संसदभवन पोलीस स्थानकात गांधी यांच्याविरोधात तक्रार सादर केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ काँग्रेसनेही पोलीस स्थानकात आपल्या बाजूची तक्रार सादर केली आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत खासदारांचा हत्येचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी यांच्या डोक्याला जखम झाली असून रक्तस्रावही झाला. तसेच या पक्षाच्या एका महिला खासदारानेही गांधी यांनी ढकलून पाडल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळले आहेत. तर, भाजपच्यावतीनेही शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषद घेत निवेदन केले. राहुल गांधी यांनी धक्काबुक्की आणि गुंडागर्दी केली असून काँग्रेसने लोकशाहीच पायदळी तुडवल्याचा पलटवार केला. गुरुवारी संसद भवन परिसरात घडलेल्या या घटनेचे पडसाद देशात अन्यत्रही उमटले आहे. तसेच राजकीय नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
राहुल गांधी यांची बाजू
भारतीय जनता पक्षाच्या खासदारानेच मला संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्याने मला ढकलण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन नंतर राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत केले. मी केलेल्या धक्काबुक्कीचा प्रकार तुमच्या कॅमेऱ्यावर दिसला असेल. पण केवळ धक्काबुक्कीने काहीच होत नाही. तो प्रकार महत्वाचा नाही, असेही धक्कादायक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न गांधी यांनी केला. या सर्व प्रकारचे व्हिडीओ चित्रण करण्यात आले असून हे चित्रण या प्रकरणातील सर्वात महत्वाचा पुरावा ठरणार आहे, असे मत अनेक कायदेतज्ञांनी नंतर व्यक्त केले. मुख्य मुद्दा आंबेडकरांचा अवमान अमित शहा यांनी केला, आहे, असे स्पष्ट करण्याचा प्रयत्नही राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत केल्याचे दिसून आले.
दोन्ही बाजूंकडून निदर्शने
संसद परिसरात गुरुवारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या अनेक खासदारांनी निदर्शने केली. काँग्रेसने आंबेडकरांचा अवमान अनेकदा केला आहे. आजही काँग्रेसची या संदर्भातील भूमिका तशीच आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान सहन करणार नाही. आंबेडकरांचा अवमान काँग्रेसने सातत्याने केल्याची अनेक उदाहरणे आहेत. संसदेतील चर्चेत ती स्पष्ट झाली आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या आंदोलक खासदारांनी केले. तर काँग्रेसच्या आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनीही गुरुवारी संसद परिसरात निदर्शने करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या त्यागपत्राची मागणी केली.
नेमके प्रकरण काय ?
अमित शहा यांनी केलेल्या विधानांनंतर उपस्थित झालेला वाद बुधवारपासून तापला आहे. गुरुवारी संसदेच्या ‘मकरद्वार’ या प्रवेशद्वारात तो शिगेला पोहोचला. राहुल गांधी काँग्रेसच्या काही खासदारांसह तेथे आले होते. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे काही खासदारही तेथे येत होते. यावेळी वादावादी होऊन मोठा गोंधळ उडाला. राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाचे ओडिशातील खासदार प्रतापसिंग सारंगी यांना जोरात ढकलल्यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. याच पक्षाचे खासदार मुकेश राजपूत यांनाही गांधी यांनी ढकलले. त्यामुळे त्यांच्याही डोक्याला जखम झाली, असा आरोप आहे. ही घटना व्हिडीओ कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. जखमी खासदारांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. ही गंभीर घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सेशल मिडियावरही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या धक्काबुक्कीचे व्हिडीओ चित्रण आता मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्याने नेमका प्रकार लोकांना स्पष्ट दिसला आहे. कोणी काय केले, हे स्पष्ट असल्याने त्वरित कारवाई केली जावी, अशी मागणी आता या प्रकरणात सर्वसामान्य लोकांकडून आणि मान्यवरांकडून होत आहे.
संसदेचे नियम काय सांगतात…
- संसद किंवा विधिमंडळ सभागृहात लोकप्रतिनिधी जे बोलतात त्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करता येत नाही, किंवा न्यायालयात दाद मागता येत नाही. कारण तशा विशेषाधिकार त्यांना असतो. तसेच संसदेत जे घडले त्याचे रिपोर्टींग जसेच्या तसे केल्यास त्यालाही घटनेचे संरक्षण आहे. कुहेतूने रिपोर्टींग केल्यास मात्र, तो विषेशाधिकाराचा भंग मानला जातो आणि कारवाई केली जाऊ शकते.
- संसदेतील कामकाजाविषयी किंवा सदस्यांच्या वर्तणुकीसंदर्भात न्यायालयांनाही हस्तक्षेप करता येत नाही. तथापि, संसदेत किंवा संसद परिसरात खासदारांची धक्काबुक्की झाली किंवा खासदारांनी दुसऱ्या खासदारावर हल्ला केला, तर मात्र तो संसदीय विषेशाधिकाराचा भंग ठरतो. अशा स्थितीत संबंधित सदस्यांवर कारवाई करण्याचे आधिकार लोकसभा किंवा राज्यसभेच्या सदस्यांना असतात. असे अध्यक्ष यासंदर्भात निश्चित नियमानुसार त्यांच्या अधिकारात कारवाई करु शकतात.
अनुराग ठाकूर यांचे आरोप
राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांवर हल्ला केला असून त्यांनी दोन खासदारांना केलेल्या धक्काबुक्कीत ते गंभीर जखमी झाले आहेत. आमच्या पक्षाच्या एका महिला खासदाराशीही त्यांनी दुर्व्यवहार केला असून पक्षाने सादर केलेल्या तक्रारीत सर्व घटनेचे सविस्तर वर्णन आहे. व्हिडीओ चित्रणातही या सर्व बाबी स्पष्टपणे दिसून येत आहेत. राहुल गांधींची वर्तणूक दुर्भाग्यपूर्ण आहे, असे गंभीर आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गांधी यांच्यावर केले आहेत.
कारवाई झाल्यास परिणाम काय…
धक्काबुक्की प्रकरणात राहुल गांधी यांचे नेमके काय होणार, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. लोकसभेचे अध्यक्ष त्यांच्यावर कठोर कारवाई करु शकतात असे अनेक तज्ञांचे मत आहे. ते दोषी आढळल्यास त्यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागू शकते. पोलिसात त्यांच्याविरोधात सादर करण्यात आलेल्या तक्रारीचे काय होणार असाही प्रश्न आहे. हे प्रकरण संसदेच्या परिसरात घडल्याने पोलीस यात लक्ष घालू शकतात का, हाही प्रश्न आहे. या संबंधीची परिस्थिती येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ..
संसद परिसरात प्रचंड गदारोळ
- आंबेडकर अवमान प्रकरणी संसद परिसरातील धक्काबुक्कीवर लोक नाराज
- लोकसभेच्या अध्यक्षांना कारवाईचे अधिकार असल्याचे अनेक तज्ञांचे मत
- गुरुवारीही गदारोळामुळे संसदेचे कामकाज स्थगित, दोन्ही बाजूंची निदर्शने









