40 हजाराची लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांकडून कारवाई
बेळगाव : खासगी शाळेचा परवाना नूतनीकरणासाठी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. लोकायुक्त पोलीसप्रमुख हनुमंत राय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात ही कारवाई केली आहे. तुरमुरी (ता. कित्तूर) येथील अर्जुन रुद्राप्पा कुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोकायुक्तांनी सापळा रचून शिक्षणाधिकाऱ्यांना जाळ्यात अडकविले आहे. तुरमुरी येथील बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या विश्वविद्या चेतन खासगी प्राथमिक शाळेच्या परवाना नूतनीकरणासाठी ऑनलाईनद्वारे बेंगळूर येथील उपसंचालक शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडे अर्ज करण्यात आला होता. पुढील कार्यवाहीसाठी हा अर्ज जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आला होता. ऑनलाईन अर्ज स्वीकारून परवाना नूतनीकरणासाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी 40 हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे अर्जुन कुरी यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. शिक्षणाधिकाऱ्यांना 40 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.









