ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना जामीन मिळाल्यानंतर ठाण्याचे डीसीपी विनय राठोड (DCP Vinay Rathod) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने परिमंडल पाचमधून डीसीपी राठोड यांची वाहतूक शाखेत ट्रान्सफर केली आहे. मला अटक करताना पोलिसांवर दबाव होता. डीसीपी राठोड यांच्या चेहऱ्यावर तर अटकेवेळी हतबलता दिसत होती, असं जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले. आव्हाडांच्या पत्रकार परिषदेनंतर पुढच्या दोन तासांतच डीसीपी राठोड यांची गृहमंत्रालयाने ट्रान्सफर ऑर्डर काढली. डीसीपी राठोडांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा जितेंद्र आव्हाडांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रयत्न केला होता. यादरम्यान चित्रपटगृहात राडाही झाला होता. याच प्रकरणावरुन आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला होता. शुक्रवारी सायंकाळी त्यांना अटक झाली होती. अटकेनंतर शनिवारी कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण आव्हाडांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केल्यानंतर हॉलिडे कोर्टाने आव्हाडांसह इतरही १२ जणांना जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानंतर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या घटनेचा घटनाक्रम कथन केला.
हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर
डीसीपी राठोड यांच्या चेहऱ्यावर तर अटकेवेळी हतबलता दिसत होती. दर तीन मिनिटांनी डीसीपी उठायचे आणि एस… एस… सर म्हणत बाहेर जायचे आणि परत यायचे, त्यामुळे पोलिसांचा माझ्या अटकेमध्ये कोठेही दोष आहे, असे मी म्हणणार नाही, असं जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत म्हणाले. कालच्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी ठाण्याचे डीसीपी विनय राठोड यांचे नाव घेतले होते. त्यामुळे राठोड यांची बदली एवढ्या तडकाफडकी पद्धतीने कशी झाली, याची चर्चा सुरू झाली आहे.