राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी विजय, जैस्वाल, बटलर यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ गुवाहटी
2023 च्या टाटा आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आपला दुसरा विजय नेंदवताना दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेत वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 199 धावा जमवल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 9 बाद 142 धावा जमवल्याने त्यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर या सलामीच्या जोडीने 8.3 षटकात 98 धावांची भागीदारी केली. मुकेशकुमारने जैस्वालचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल टिपला. त्याने 31 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारासह 60 धावा जमवल्या. राजस्थानची ही सलामीची जोडी फुटल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला कर्णधार सॅमसंग खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. कुलदीप यादवने त्याला झेलबाद केले. पॉवेल रियान परागचा सात धावावर त्रिफळा उडवला. बटलरने 51 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारासह 79 धावा झळकवल्या. तो 19 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. हेटमेयरने 21 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 39 तर जुरेलने 3 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 8 धावा जमवल्या. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 4 बाद 199 धावा जमवत दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले. राजस्थानच्या डावामध्ये 7 षटकार आणि 23 चौकार नोंदवले गेले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे मुकेशकुमारने 2 तर कुलदीप यादव आणि पॉवेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीच्या डावाला पहिल्या षटकातच गळती सुरू झाली. बोल्टच्या पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामीचा पृथ्वी शॉ खाते उघडण्यापूर्वी सॅमसंगकरवी झेलबाद झाला. त्यानंतर बोल्टने चौथ्या चेंडूवर मनीष पांडेला पायचित केले. दिल्लीची स्थिती यावेळी 2 बाद 0 अशी होती. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एकाकी लढत देत 55 चेंडूत 7 चौकारासह 65 धावा जमवल्या. रॉसोने 12 चेंडूत 2 चौकारासह 14 तर ललित यादवने 24 चेंडूत 5 चौकारासह 38 धावा जमवल्या. रॉसो आणि वॉर्नर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 36 धावांची तर वॉर्नरने यादवसमवेत चौथ्या गड्यासाठी 64 धावांची भागीदारी केली. दिल्लीच्या केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. वॉर्नर आठव्या गड्याच्या रुपात बाद झाला. दिल्लीच्या डावामध्ये 15 चौकार नोंदवले गेले. राजस्थानतर्फे बोल्टने 29 धावात 3, यजुवेंद्र चहलने 27 धावात 3, रविचंद्रन अश्विनने 25 धावात 2 तर संदीप शर्माने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स 20 षटकात 4 बाद 199 (यशस्वी जैस्वाल 60, बटलर 79, हेटमेयर नाबाद 39, ज्युरेल नाबाद 8, पराग 7, अवांतर 6, मुकेशकुमार 2-36, कुलदीप यादव 1-31, पॉवेल 1-18), दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 9 बाद 142 (वॉर्नर 65, ललित यादव 38, रॉसो 14, अवांतर 10, बोल्ट 3-29, यजुवेंद्र चहल 3-27, रविचंद्रन अश्विन 2-25, संदीप शर्मा 1-20).








