सामनावीर रॉस्सोची शानदार अर्धशतकी खेळी, शॉचे अर्धशतक, नॉर्त्जे-इशांतचे 2 बळी
वृत्तसंस्था/ धरमशाला
रिली रॉस्सोचे धडाकेबाज नाबाद अर्धशतक, उशिरा सूर गवसलेल्या पृथ्वी शॉने केलेली अर्धशतकी खेळी आणि गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी यांच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमधील साखळी सामन्यात पंजाब किंग्सचा 15 धावांनी पराभव केला. पंजाबच्या लिव्हिंगस्टोनने केलेली 94 धावांची शानदार खेळी मात्र वाया गेली.
पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली आणि कर्णधार शिखर धवनने दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. रॉस्सो, पृथ्वी शॉ, वॉर्नर व सॉल्ट यांच्या फटकेबाजीमुळे दिल्लीने 20 षटकांत 2 बाद 213 धावा फटकावल्या. त्यानंतर पंजाब किंग्सला 20 षटकांत 8 बाद 198 धावांवर रोखत या मोसमातील पाचवा विजय मिळविला. त्यांचे आव्हान याआधीच संपुष्टात आले असल्याने या विजयाचा त्यांना फारसा फायदा होणार नाही. 10 गुणांसह ते नवव्या स्थानावर आहेत.

कठीण आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची खराब सुरुवात झाली. खलील अहमदने पहिले षटक निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार धवन शून्यावर बाद झाला. प्रभसिमरन सिंग व अथर्व तायडे यांनी अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर सिंग 22 धावांवर बाद झाला. नंतर तायडेसह लिव्हिंगस्टोनने डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 50 चेंडूत 78 धावांची भर घातली. तायडे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिक 55 धावांवर निवृत्त झाला. त्याने 42 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार मारले. जितेश शर्मा (0), शाहरुख खान (6), सॅम करन (5 चेंडूत 11), हरप्रीत ब्रार लवकर बाद झाल्याने पंजाबच्या आशा अंधुक झाल्या. एकाकी झुंज देणाऱ्या लिव्हिंगस्टोनने करनच्या साथीने अखेरच्या टप्प्यात धडपड केली. दोघांनी 11 चेंडूत 53 धावा झोडपल्या. पण लिव्हिंगस्टोनचे प्रयत्न शेवटी अपुरे पडले. शेवटच्या चेंडूवर षटकार मारत शतक पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्नही सफल झाला नाही. डीपमध्ये तो झेलबाद झाल्याने त्याचे शतक हुकले. त्याने 48 चेंडूत 5 चौकार व तब्बल 9 षटकारांची आतषबाजी करीत 94 धावांची बरसात केली. पंजाबला अवांतराच्या 10 धावा मिळाल्या. दिल्लीच्या इशांत शर्मा, नॉर्त्जे यांनी प्रत्येकी 2 तर खलील अहमद व अक्षर पटेलने एकेक बळी टिपले.
वॉर्नर-शॉ यांची 94 धावांची सलामी
दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर व पृथ्वी शॉ यांनी दमदार सलामी देताना पहिल्या गड्यासाठी 10.2 षटकांत 94 धावांची भागीदारी केली. दोघांनीही दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत जलद धावा फटकावल्या. या दोघांनी पॉवरप्लेच्या 6 षटकांत 61 धावा फटकावताना संघाचे अर्धशतक 28 चेंडूत नोंदवले. 11 व्या षटकात वॉर्नरला बाद करून सॅम करनने ही जोडी फोडली. वॉर्नरने 31 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 46 धावा काढल्या. पृथ्वी शॉला बऱ्याच दिवसानंतर फॉर्म गवसल्यानंतर त्याने 36 चेंडूत 6 चौकार, एका षटकाराच्या मदतीने अर्धशतकी मजल मारली. मात्र अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर करननेच त्याचाही बळी मिळविला. तायडेने त्याचा झेल टिपला, तेव्हा त्याने 38 चेंडूत 54 धावा फटकावल्या होत्या. त्यात 7 चौकार, एका षटकाराचा समावेश होता. शॉ व रिली रॉस्सो यांनी दुसऱ्या गड्यासाठी 28 चेंडूत 54 धावांची जलद भागीदारी केली. दिल्लीने 93 चेंडूत दीडशतकी मजल मारली तेव्हा त्यांनी दोन गडी गमविले होते.

आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या रॉस्सोने नंतर 25 चेंडूत वैयक्तिक अर्धशतक 3 चौकार, 4 षटकारांच्या मदतीने पूर्ण केले. अखेरच्या टप्प्यात त्याने फिल सॉल्टसमवेत जोरदार फटकेबाजी करीत तिसऱ्या गड्यासाठी 30 चेंडूतच अभेद्य 65 धावांची भागीदारी केली. रॉस्सोने चौकार, षटकारांची आतषबाजी करीत नाबाद 82 धावा तडकावल्या. त्याने 37 चेंडूत 6 चौकार, 6 षटकारांची आतषबाजी केली. फिल सॉल्टनेही फक्त 14 चेंडूतच झटपट 26 धावा फटकावल्या. त्याने आपल्या नाबाद खेळीत 2 चौकार, 2 षटकार मारले. या दोघांनी हरप्रीत ब्रारने टाकलेल्या शेवटच्या षटकात 2 षटकार, 2 चौकारांसह एकूण 23 धावा वसूल करीत संघाला दोनशेच्या पुढे मजल मारून दिली. 116 चेंडूत दिल्लीचे द्विशतक फलकावर लागले. पंजाबच्या केवळ सॅम करनलाच 2 बळी मिळविता आले. नाथन एलिस, राहुल चहर, हरप्रीत ब्रार महागडे गोलंदाज ठरले. त्यांना एकही बळी मिळविता आला नाही.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 2 बाद 213 : डेव्हिड वॉर्नर 31 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 46, पृथ्वी शॉ 38 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 54, रिली रॉस्सो 37 चेंडूत 6 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 82, फिल सॉल्ट 14 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 26, अवांतर 5. गोलंदाजी : सॅम करन 2-36, रबाडा 0-36 (3 षटके), अर्शदीप 0-21 (2 षटके), एलिस 0-46, चहर 0-35, हरप्रीत ब्रार 0-39 (3 षटके).
पंजाब किंग्स 20 षटकांत 8 बाद 198 : प्रभसिमरन सिंग 19 चेंडूत 4 चौकारांसह 22, धवन 0, अथर्व तायडे 42 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 55, लिव्हिंगस्टोन 48 चेंडूत 5 चौकार, 9 षटकारांसह 94, करन 5 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 11, अवांतर 10. गोलंदाजी : इशांत 2-36, नॉर्त्जे 2-36, खलील अहमद 1-20, अक्षर पटेल 1-27.









