सांगली :
सांगली शहरातील एस. टी. स्टॅण्ड मार्गावरील फौजदार गल्लीतील अष्टविनायक मंडळाने यंदा गणेशोत्सवात इतिहास जिवंत केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या दरबारातून सुटका हा थरारक प्रसंग मंडळाने ध्वनी-प्रकाशाच्या माध्यमातून उभा केला आहे. विशेष म्हणजे हा देखावा पहिल्यांदाच दिवसा शाळकरी मुलांसाठी खुला करण्यात आला.
मंगळवारी सकाळी बापट बाल शिक्षणमंदिर मधील साडेतीनशे विद्यार्थी आणि गणपतराव आरवाडे हायस्कूलचे साडेतीनशे विद्यार्थी असे एकूण सातशे विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह देखाव्यास हजेरी लावली. दरम्यान गणेशोत्सव मंडपात “जय भवानी, जय शिवाजी’च्या मुलांकडून देण्यात आलेल्या जोरदार घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
“इतिहासात वाचलेले प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले, जणू आम्हीच त्या काळात गेलो आहोत,” असे एका विद्यार्थ्याने उत्साहाने सांगितले. शिक्षकांनीही या संधीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिवरायांचा पराक्रम आणि धैर्य याबाबत मार्गदर्शन केले.
साऊंड आणि लाइट्सच्या नेत्रदीपक सादरीकरणामुळे औरंगजेबाचा दरबार, किल्ल्याची कारागृहं, वेशांतर करून सुटका करणारे महाराज हे सर्व दृश्ये वास्तवाचा अनुभव देणारी ठरली. मुलांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले.
अष्टविनायक मंडळाचा हा पहिलाच दिवसा देखावा दाखवण्याचा आयोजित उपक्रम असल्याने शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी वर्ग आणि मंडळाचे कार्यकर्ते सर्वांनीच मोठे सहकार्य केले. “विद्यार्थ्यांसाठी इतिहास शिकण्याची ही सर्वोत्तम पद्धत आहे,” असे शिक्षकांचे मत होते.
या उपक्रमामुळे केवळ मनोरंजनच नव्हे, तर इतिहासाविषयीची जाणही विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. यावेळी देखावा पाहताना विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता.








