वृत्तसंस्था/ समस्तीपूर
बिहारमधील समस्तीपूर येथे न्यायालय परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. सदर उपविभागातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवाणी न्यायालयाच्या आवारात शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कल्याणपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी प्रभात कुमार चौधरी आणि समस्तीपूरमधील रहिवासी प्रभात तिवारी यांना एका प्रकरणात न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणल्यानंतर गुन्हेगारांनी अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारानंतर संपूर्ण न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. गुन्हेगाराने झाडलेली गोळी प्रभात तिवारी यांच्या डाव्या हाताला लागली, तर एक गोळी प्रभातकुमार चौधरी यांच्या पायाला लागली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक विनय तिवारी स्वत: न्यायालयाच्या आवारात पोहोचल्यानंतर या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. दोन्ही जखमी कैद्यांवर समस्तीपूर सदर ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. समस्तीपूर न्यायालयाच्या आवारात गुन्हेगारांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारानंतर पुन्हा एकदा न्यायालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.









