उंडाळे :
कराड तालुक्यातील उंडाळे गावच्या शेवाळवाडी रोडवर असलेल्या अमोल शेवाळे आणि गणेश शेवाळे या सख्ख्या भावांच्या बंगल्यात भरदुपारी चोरट्यांनी दरवाजा फोडून प्रवेश केला. घरातील कपाट तोडून पाच ते सात तोळे सोने आणि अंदाजे दहा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल व गणेश शेवाळे या बंधूंचा बंगला उंडाळे येथील शेवाळवाडी रस्त्यावर आहे. घटनेच्या वेळी दुपारी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. त्यांनी कपाट उघडून त्यातील पाच ते सात तोळे सोने आणि रोख रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी घरातील साहित्यही अस्ताव्यस्त केले होते.
दरम्यान, गणेश शेवाळे यांच्या खोलीतील कपाट फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र ते कपाट न उघडल्याने तेथून पलायन केले.
या घटनेची माहिती मिळताच उंडाळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद झालेली नव्हती.








