15 दिवसांत 13 जणांचे निधन : भीतीचे वातावरण
वार्ताहर /कडोली
गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसागणिक एक असे मृत्यूचे सत्र सुरू असून हे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने कडोली ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे. मृत्यूच्या कचाट्यात वयस्करांबरोबर तरुणांचाही समावेश आहे. गेल्या दि. 25 डिसेंबर 2023 पासून कडोली गावात मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. आजतागायत हे प्रमाण दिवसागणिक एक असे ठरत असल्याने ग्रामस्थांत तर्कवितर्कांना ऊत आला आहे. खराब हवामानामुळे हा प्रकार घडत असल्याचे अनेक जाणकारांतून मत व्यक्त केले जात आहे. अल्पशा आजारांबरोबर हृदयविकाराच्या झटक्यानेही अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या 15 दिवसात उमेश सदाशिव मायाण्णा, परशराम उच्चूकर, लक्ष्मण पवार, राजू मॅगेरी, दादासाब गब्बारसाब शेख, सुमन मनोहर पाटील, कमल गणपती डोंगरे, कमळाबाई राजाई, यल्लाप्पा मानमोडे, गुरुनाथ हुवाप्पा कुट्रे, आनंदीबाई बाळाराम मरगाळे अशा अनेक महिला आणि पुरुष व्यक्तिंना मृत्यूने कवटाळले आहे.
राजेंद्र आपटेकर यांचे शुक्रवारी निधन
शिवाय गुरुवारी सायंकाळी इंदुबाई यशवंत पवार (वय 72) रा. कचेरी गल्ली यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 6 मुलगे, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तर शुक्रवारी सकाळी कलमेश्वर गल्लीतील रहिवासी राजेंद्र शंकर आपटेकर (वय 54) यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. 15 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.









