हेस्कॉम-केपीटीसीएल कर्मचाऱ्यांची कैफियत : वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामात चुकीला माफी नाही
बेळगाव : दोन मिनिटे जरी वीजपुरवठा ठप्प झाला तरी आपला जीव कासावीस होतो. ऊन असो वा धो-धो कोसळणारा पाऊस, दिवस असो वा रात्र खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करावाच लागतो. काहीवेळा जीवावर उदार होवून दुरूस्तीचे काम करावे लागते. इतर व्यवसायांमध्ये चुकीला माफी असते. परंतु वीजपुरवठा दुरुस्ती करताना जराशी जरी चूक झाली तर जीव गमावू शकतो. त्यामुळे ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ म्हणत हेस्कॉम व केपीटीसीएलचे कर्मचारी काम करीत असतात. विद्युतवाहिनी अथवा ट्रान्स्फॉर्मरच्या दुरुस्तीवेळी विजेचा धक्का लागून हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे. विजेचा धक्का बसल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सुरक्षित उपकरणांचा वापर सक्तीने करणे गरजेचे झाले आहे. मागील दोन वर्षात बेळगाव व खानापूर तालुक्यात हेस्कॉमच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर विजेचा धक्का बसून नागरिकांनाही इजा पोहचली आहे. यामध्ये एक महिला तर 17 नागरिक जखमी झाल्याची नोंद हेस्कॉमकडे आहे.
नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
हेस्कॉममध्ये दाखल झालेल्या नवीन कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत तितकेसे माहिती नसते. त्यामुळे सर्व पॉवरमन, ज्युनिअर इंजिनिअर यांना हुबळी येथील कार्यालयात प्रशिक्षण देण्यात येते. यावेळी त्यांना विद्युत खांबावर चढताना घ्यावयाची खबरदारी, सुरक्षा उपकरणांचा वापर याविषयी माहिती देण्यात येते. याचबरोबर विभागीय स्तरावरदेखील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असते. विद्युत वाहिनीची दुरुस्ती असल्यास एलसी (वीजपुरवठा बंद करून) काम केले जाते. परंतु विशेषत: ग्रामीण भागात एका फिडरमधून वीजपुरवठा बंद असतो. तर दुसरी वाहिनी सुरू असते. दुरुस्ती करताना वीजपुरवठा सुरू असणाऱ्या वाहिनीवर पक्षी अथवा झाडाची फांदी कोसळल्यास वाहिन्या एकामेकाला जोडू शकतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. काही दिवसांपूर्वी लोंढा येथे अशीच घटना घडली होती. तसेच शहर भागात दुरुस्ती सुरू असताना जनरेटर अथवा इनर्व्हटर सुरू केल्यास विजेचा प्रवाह उलट येऊन धक्का लागण्याची शक्यता असते.
अनेकांना आले अपंगत्व
विजेचा धक्का लागल्याने अनेक कर्मचाऱ्यांना अपंगत्व तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. काहींनी हात, पाय गमावले आहेत. त्यांना हेस्कॉमने कार्यालयीन कामकाजासाठी कामावर घेतले आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व काही जणांच्या कुटुंबीयांना हेस्कॉमने नोकरीत सामावून घेतले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे.
तरुण पॉवरमनना सर्वाधिक अपघात
मागील 5 ते 6 वर्षांचा विचार करता बेळगाव विभागात झालेल्या अपघातांमध्ये तरुण पॉवरमनची संख्या सर्वाधिक आहे. नंदिहळ्ळी येथे ट्रान्स्फॉर्मरच्या दुरुस्तीवेळी तरुण पॉवरमनला विजेचा धक्का बसला. यामध्ये तो जागीच मृत्युमुखी पडला. अशीच घटना दोन वर्षांपूर्वी आलारवाड येथे घडली होती. तेव्हाही तिशीच्या आतील पॉवरमनला जीव गमवावा लागला. त्यामुळे तरुण पॉवरमनने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सूचनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
विद्युतवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करताना कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या सूचना केल्या जातात. हेस्कॉमने दिलेली सर्व सुरक्षा उपकरणे वापरूनच दुरुस्तीचे काम करण्यास सांगण्यात येते. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात धोका अधिक असल्यामुळे खबरदारी घेण्याची सूचना कर्मचाऱ्यांना हेस्कॉमतर्फे केल्या जातात. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचेही आयोजन केले जाते.
– ए. एम. शिंदे (साहाय्यक कार्यकारी अभियंता)
सुरक्षा उपकरणांचा वापर केला जात नसल्याने कर्मचाऱ्यांचे नाहक बळी
हेस्कॉमकडून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी साहित्य पुरविले जाते. विद्युतवाहिनी अथवा ट्रान्स्फॉर्मरच्या दुरुस्तीवेळी एका बाजूचा वीजपुरवठा बंद केला जातो. परंतु काहीवेळा पक्षी अथवा फांदी कोसळल्यास विद्युतवाहिनी जोडली जाऊन विजेचा धक्का लागू शकतो. तसेच काहीवेळा वेळ कमी असल्याने सुरक्षा उपकरणांचा वापर केला जात नसल्याने कर्मचाऱ्यांचे नाहक बळी जात आहेत. कर्मचाऱ्यांनीही वेळ लागला तरी हरकत नाही. परंतु सुरक्षेविना विद्युत खांबावर चढू नये.
– मारुती दोडमनी (कार्याध्यक्ष- विद्युत कर्मचारी युनियन)









