वृत्तसंस्था / लंडन
यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यात सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे 23 जुलैपासून खेळविला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली असून डावखुला फिरकी गोलंदाज लियाम डॉसनचे तब्बल 8 वर्षानंतर पुनरागमन होत आहे.
या मालिकेत यजमान इंग्लंडने लॉर्डस्ची तिसरी कसोटी जिंकून भारतावर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. लॉर्डस्च्या तिसऱ्या कसोटीत शौकिनांना शेवटच्या क्षणापर्यंत थरारक खेळ पहावयास मिळाला. भारताने इंग्लंडला विजयासाठी चांगलेच झुंजविले.
35 वर्षीय डॉसनने 2017 साली द. आफ्रिकेविरुद्ध आपली शेवटची कसोटी खेळली होती. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तीन कसोटीत 7 बळी तसेच त्याने 6 वनडे आणि 14 टी-20 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 212 सामन्यात त्याने 371 बळी मिळविले असून फलंदाजीत त्याने 18 शतकांसह 10 हजारांपेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत.
इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), आर्चर, अॅटकिन्सन, बेथेल, ब्रुक, कार्स, क्रॉले, डॉसन, डकेट, पॉप, रुट, स्मिथ, टंग आणि वोक्स









