न्हावेली फणसवाडी येथे 33 केव्ही वाहिनीवर झाड कोसळले, भर पावसातही सत्तरीतील नळ कोरडे, आज संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्वपदावर
वाळपई : सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दाबोस पाणी प्रकल्प 21 तास बंद पडला. यामुळे सत्तरी तालुक्याच्या सर्वच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भर पावसातही सर्व भागातील नळ कोरडे पडले. मंगळवारी दुपारी 2.30 वाजता प्रकल्प सुरू झाला. यामुळे बुधवारी रात्रीपर्यंत सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाणी पूर्वपदावर येणार आहे. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्यास पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याची टंचाई सर्व भागांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान एवढा वेळ पाणी प्रकल्प बंद होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. प्राप्त माहितीनुसार न्हावेली फणसवाडी येथे 33 केव्ही क्षमतेच्या वीज वाहिनीवर झाड पडल्यामुळे सोमवारी रात्री सत्तरी तालुक्याचा वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. सत्तरी तालुक्याच्या होंडा व इतर भागांमध्ये साखळी भागातून वीजपुरवठा केला. मात्र वाळपई व ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा ठप्प झाला. याचा प्रतिकूल परिणाम दाबोस पाणी प्रकल्पावर झाला. तालुक्यातील जनतेला सोमवारी रात्रभर विजेअभावी रात्र काढावी लागली. मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला.
दुपारी 2.30 वाजता प्रकल्प सुरू
दुपारी 2.30 वाजता वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर प्रकल्प चालू केला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वाळपई नगरपालिका क्षेत्रातील सभोवतालच्या नजीक भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होईल. मात्र इतर भागांना बुधवारी संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. सुमारे 21 तास पाणी प्रकल्प बंद पडला. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे प्रकल्पावर परिणाम झाल्याचे साहाय्यक अभियंता प्रशांत गावडे यांनी सांगितले.
झाड हटविण्यास रात्रभर कसरत
वीज वाहिन्यांवरील झाड दूर करण्यासाठी रात्रभर कसरत करावी लागली. यासाठी डिचोली, वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांची मदत घेण्यात आली. पहाटे झाड बाजूला केल्यानंतर वीज वाहिन्यांची दुऊस्ती तातडीने हाती घेतली. त्यानंतर मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरू करण्यात आला, असे याबाबत अधिक माहिती देताना वाळपई सहाय्यक अभियंता दीपक गवस यांनी सांगितले.
टँकरच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम
दाबोस पाणी प्रकल्पाला अडचण निर्माण झाल्यास व अन्य गावांमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असतो. मात्र विजेअभावी टँकर भरण्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. यामुळे सत्तरी तालुक्यातील कोणत्याही गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करता आला नाही. भर पावसातही सत्तरी तालुक्यातील नळ कोरडे पडल्यामुळे अनेक गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काही गावातील नागरिकांनी नदीवर जाऊन पाण्याची व्यवस्था केली तर अनेक गावातील नागरिकांनी रिक्षेचा वापर करून दुसऱ्या गावातून पाण्याची व्यवस्था केल्याचे दिसून आले.
जनरेटरची सोय असती तर…
दरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दाबोस प्रकल्पाची यंत्रणा बंद पडली. दहा वर्षापासून दाबोस पाणी प्रकल्पाला जनरेटरची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे. मात्र ती व्यवस्था अजून पर्यंत केलेली नाही. या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था असती तर वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरवर प्रकल्पाची यंत्रणा सुरू करणे शक्य होते. मात्र याकडे संबंधित खात्याने अजून पर्यंत लक्ष दिलेले नाही.









