अनुभवी रोहन बोपण्णा आज संघात सहभागी होणार
वृत्तसंस्था/ लखनौ
अमेरिकन ओपनच्या पुरूष दुहेरीत उपविजेता ठरलेला टेनिसपटू रोहन बोपण्णा आज बुधवारी भारतीय संघात सामील होणार आहे, असे भारताचा डेव्हिस चषक कर्णधार रोहित राजपालने सांगितले आहे. लखनौच्या गोमतीनगर येथील मिनी स्टेडियमवर शनिवारी आणि रविवारी होणार असलेल्या जागतिक गट-2 मधील प्ले-ऑफ सामन्यांतर्गत भारताची गांठ मोरोक्कोशी पडणार असून या सामन्याची यजमानांकडून तयारी चालली आहे.
सध्या दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या 43 वर्षीय बोपण्णाने गेल्या आठवड्यात अमेरिकन ओपनमध्ये बजावलेली कामगिरी त्याचे कौशल्य दाखवून जाते. अखिल भारतीय टेनिस संघटनेचे (एआयटीए) अध्यक्ष अनिल जैन यांनी या दिग्गज टेनिसपटूचे कौतुक केले आहे. ‘डेव्हिस चषक ही एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे आणि ती अनेक दिग्गज क्षणांची साक्षीदार आहे. लखनौमधील हा सामना आम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे. ‘एआयटीए’ आणि देशातील सर्व टेनिसप्रेमींच्या वतीने आम्ही रोहन बोपण्णाचे अभिनंदन करतो आणि डेव्हिस चषक स्पर्धेत भारताला शेवटच्या खेपेला सेवा देताना त्याला पाहण्यास आम्ही सर्व जण आतूर झालेलो आहोत’, असे त्यांनी म्हटले आहे.
बोपण्णाच्या व्यतिरिक्त सहा सदस्यीय भारतीय डेव्हिस चषक संघात देशातील एकेरीतील अव्वल खेळाडू सुमित नागलसह शशिकुमार मुकुंद, दिग्विजय प्रताप सिंग, युकी भाबरी आणि रामकुमार रामनाथन यांचा समावेश आहे. ‘रोहन बोपण्णा बुधवारी संघाच्या सरावात सामील होणार आहे. तो 2002 पासून भारतीय डेव्हिस चषक संघाचा भाग राहिलेला आहे आणि त्याच्या उपस्थितीमुळे संघाला अनमोल अनुभवाची जोड मिळते. आमच्याकडे अनुभव आणि युवाशक्ती यांचा मेळ घालणारा समतोल संघ आहे आणि आमच्या संघात सर्वोत्तम कामगिरी करून दाखविण्याची क्षमता आहे असा विश्वास मला वाटतो’, असे भारतीय डेव्हिस चषक संघाचा ‘नॉन-प्लेइंग कॅप्टन’ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा कार्यकारी समिती सदस्यही असलेल्या राजपालने संघाच्या तयारीबद्दल भाष्य करताना सांगितले.
राजपाल आणि इतर ‘एआयटीए’ पदाधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांना लढतीचे पहिले तिकीट देऊन आमंत्रित केले आहे. शुक्रवारी ड्रॉ होणार आहे. येथील विजयामुळे 2024 च्या डेव्हिस चषक जागतिक गट-1 च्या प्ले-ऑफमधील भारताचे स्थान निश्चित होईल. शनिवारी दुपारी 12 वा., तर रविवारी सकाळी 11 वा. सामने सुरू होतील









