वृत्तसंस्था/ मलागा
येथे झालेल्या डेव्हिस चषक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फिनलँडने विद्यमान विजेत्या कॅनडाला 2-1 असा पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली. प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर फिनलँडने हे यश मिळवित पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
याच महिन्यात कॅनडाने बिली जीन किंग चषक स्पर्धेतही जेतेपद मिळविले होते. डेव्हिस चषक उपांत्यपूर्व लढतीतील पहिल्या सामन्यात मिलोस रेऑनिकने पॅट्रिक कॉकोव्हाल्टाचा 6-3,7-5 असा पराभव करून कॅनडाला आघाडीवर नेले. ओटोन व्हर्टानेनने गॅब्रियल डायालोचा 6-4, 7-5 असा पराभव करून फिनलंडला बरोबरी साधून दिली. दुहेरीचा सामना मात्र निर्णायक ठरला. व्हर्टानेन व हॅरी हेलिओव्हारा यांनी अॅलेक्सिस गॅलारमॉ व व्हॅसेक पॉस्पिसिल यांच्यावर 7-5, 6-3 अशी मात करून फिनलंडला 2-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. शुक्रवारी त्यांची उपांत्य लढत ऑस्ट्रेलिया किंवा झेक प्रजासत्ताक यापैकी एकाशी होईल. याशिवाय गुरुवारी सर्बिया व ग्रेट ब्रिटन आणि इटली व नेदरलँड्स यांच्यात उपांत्यपूर्व लढती होणार आहेत.









