सरपंच धावले ग्रामस्थांच्या अंगावर प्रकरण वरिष्ठ पातळीवर नेण्याचा विचार
मडगाव : दवर्ली-दिकरपाल पंचायतीची काल रविवारी झालेली ग्रामसभा वरीच वादळी ठरली. पंचायत क्षेत्रात होऊ घातलेल्या पेट्रोल पंप संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरपंच हेर्कुलान नियासो यांना उत्तर देणे शक्य झाले नाही. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना व्यासपीठावरून खाली उतरा असे आव्हान दिले. यावेळी सरपंच नियासो परिस्थिती हाताळणे शक्य झाले नाही व थेट ग्रामस्थांच्या अंगावर चाल करून आले. यावेळी ग्रामस्थांमध्ये बसलेले पंच सदस्य साईश राज्याध्यक्ष व इतरांनी त्यांना रोखले. अन्यथा ग्रामसभेत हाणामारी झाली असती. पंचायत क्षेत्रात एक पेट्रोल पंप उभारण्यासाठी पंचायत मंडळाने ना हरकत दाखला दिला आहे. हा ना हरकत दाखला कोणत्या आधारे दिला असा सवाल काल ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित केला. पेट्रोप पंपसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अवघ्या दिड हजार चौरसमीटर जागेत पेट्रोल पंप कसा उभारला जात असल्याचा सवालही ग्रामस्थेभत उपस्थित करण्यात आला.
पेट्रोप पंपच्या मुद्दावरून ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले. हा पेट्रोल पंप बेकायदेशीर असून त्याला देण्यात आलेला ना हरकत दाखला त्वरित मागे घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यात सरपंचांना एकाही प्रश्नाचे धड उत्तर देणे शक्य झाले नाही. पेट्रोल पंप बेकायदेशीर असल्यास त्याला न्यायालयात आव्हान द्यावे असे सरपंच नियासो म्हणाले व ग्रामसभेत गोंधळ झाला. त्यात पंचायत मंडळातील पाच पंच सदस्य हे ग्रामस्थांबरोबर राहिले व त्यांनी ही हा मुद्दा उचलून धरला. सरपंच ग्रामसभेत ग्रामस्थांच्या अंगावर चाल करून गेल्याने हा चर्चेचा विषय बनला. ग्रामसभेत उपस्थित असलेल्या गट विकास अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची नोंद करून घेतली असून हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर नेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या.









