मागण्या संबंधी चर्चा होऊन करार होईपर्यंत सुरूच राहणार : कॉ. प्रा. सुभाष जाधव यांचे प्रतिपादन
कार्वे/ वार्ताहर
अथर्व इंटरट्रेड संचलित दौलत शेतकरी साखर खान्यातील कामगार आपल्या न्याय आणि हक्कासाठी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कारखान्याच्या गेटवर सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात दौलत साखर कारखान्यातील शंभर टक्के कामगार उपस्थित होते.
सिटू या कामगार संघटनेचे अध्यक्ष काँ. प्रा. सुभाष जाधव यांनी यावेळी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना, कामगारांवर हा संप लाधलेला आहे. कामगारांच्या सर्व मागण्यांसाठी प्रशासनाबरोबर चर्चा होऊन त्यातून मार्ग निघेपर्यंत एकजुटीने हा संप यशस्वी केला जाणार आहे असे सांगितले. कामगारांनी सिटू युनियनच्या माध्यमातून अथर्व व्यवस्थापनाकडे दोन वर्षे आपल्या न्याय मागण्यांसाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अथर्व प्रशासनाने या संदर्भात कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे कामगारांनी 24 जुलै रोजी सभा घेऊन चर्चेतून मागण्या मान्य होत नसतील तर बेमुदत संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार युनियनने 2 ऑगस्ट 2022 रोजी अथर्व व्यवस्थापनास संपाची कायदेशीर नोटीस व मागण्यांचे निवेदन देऊन 19 ऑगस्ट पूर्वी मागण्या मंजूर न झाल्यास बेमुदत संप केला जाणार असे सांगितले होते. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने कामगारांनी आज निर्णय घेऊन ते बेमुदत संपावर गेले आहेत.
पुढील दोन दिवसात कारखाना व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्या बाबत युनियनशी चर्चा केली नाही, तर सोमवारी चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा ने जाऊन मुख्यमंत्री व कामगार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे. असे यावेळी घोषित करण्यात आले. कामगारांच्या पगारातून सुरू असलेली कपात बंद करून एप्रिल 2022 पासून कपात केलेली रक्कम परत करावी, 2019 च्या त्रिपक्षीय करारानुसार कामगारांना 12 टक्के वेतन वाढ लागू करून त्याचा 2019 पासून चा फरक मिळावा, नियमानुसार महागाई भत्ता, वार्षिक वेतन वाढ, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम, रजा, अपघात संरक्षण व नुकसान भरपाई देण्यात यावी. कामगारांच्या अन्यायी बदल्या रद्द कराव्यात, कामगारांना सन्मानाची वागणूक द्यावी.. आदी मागण्या मान्य होईपर्यंत कामगारांनी संप सुरूच ठेवण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.
युनियनचे जनरल सेक्रेटरी प्रदीप पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सभेत कॉम्रेड आबासाहेब चौगुले, हणमंत पाटील, महादेव फाटक, अशोक गावडे, रामलिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे ऊस वाहतूकदार ज्योतिबा पाटील, दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत निकम व शिवाजी हसबे यांनी उपस्थित राहून या कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.
दौलत कारखान्याचे विद्यमान संचालक वसंत निकम यांनी यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करत असताना दौलत चा अथर्व इंटरनेटशी झालेला करार हा बेकायदेशीर आहे. या करारात कारखान्याच्या कुठल्याही संचालकाची साधी सहीही घेतलेली नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.









