वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी गावची कन्या भारती सुतार यांनी भारतरत्न पुरस्कार प्राप्त सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली आहे. नुकताच कसवड सातारा येथे स्टेडियमचा उद्घाटन सोहळा झाला. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला व सविस्तर चर्चा केली. त्यामुळे तालुक्यात त्यांचा गौरव होत आहे. बेळगुंदी हायस्कूलची माजी विद्यार्थिनी भारती हरिभाऊ सुतार या राष्ट्रीय खो खो व कबड्डी खेळाडू आहेत. त्यांनी खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देऊन अनेक खेळाडू घडविले आहेत. जिल्हा पंचायत कोल्हापूरमार्फत त्यांची प्राथमिक शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली. विद्या मंदिर बेळेभाट ता. चंदगड येथून त्यांच्या नोकरीची सुऊवात झाली. 2009 ला वि.मं. चन्नेकुपी शाळेत त्यांची बदली झाली. यावेळी येथील खेळाडूंनाही त्यांनी खो खो व कबड्डी या खेळामध्ये घवघवीत यश मिळवून दिले. सरी महांतेश सुतार हिची क्रीडा प्रबोधिनीमध्ये शिंगणापूर येथे निवड झाली. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीमुळेच माणदेशी फाउंडेशनच्या संयोजकांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधण्याची त्यांना संधी दिली. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्याशी बराच वेळ खेळ आणि क्रीडा संदर्भात चर्चा केली. हा क्षण मी आजवर क्रीडा क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानामुळेच मला मिळाला असून हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, अशी प्रतिक्रिया भारती सुतार यांनी याप्रसंगी व्यक्त केली.









