2027 पर्यंत जबाबदारी , अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत निर्णय
वृत्तसंस्था/ नागपूर
दत्तात्रेय होसबळे यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या निवडीनंतर होसबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुढील तीन वर्षे ते संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहतील. 2024 ते 2027 या कालावधीसाठी त्यांची या पदावर पुन्हा निवड झाली आहे. ते 2021 पासून या पदावर कार्यरत आहेत.
प्रतिनिधी सभेच्या शेवटच्या दिवशी सकाळी सरकार्यवाह पदासाठी निवडणूक घेण्यात आली. रा. स्व. संघाने अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत रविवारी नवीन कार्यकारी मंडळ जाहीर करण्यात आले. सहसरकार्यवाह या पदावरून मनमोहन वैद्य यांना मुक्त करण्यात आले आहे. नव्या निवडीनुसार सहा सहसरकार्यवाह नियुक्त करण्यात आले असून त्यात कृष्ण गोपाल, मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर, अतुल लिमये, आलोक कुमार यांचा समावेश आहे. अतुल लिमये हे महाराष्ट्र व पश्चिम क्षेत्रात प्रचारक होते. तर आलोक कुमार राष्ट्रीय सहप्रचार प्रमुख पदावर कार्यरत होते.
आरएसएसची वार्षिक तीन दिवसीय ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभा’ शुक्रवारी नागपूरच्या रेशीमबाग येथील स्मृती भवन संकुलात सुरू झाली. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सहा वर्षांनंतर ही बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विविध संघटनांचे 1,500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. या सभेमध्ये पहिल्या दिवशी सरकार्यवाह यांनी वार्षिक अहवाल मांडण्याबरोबरच राम मंदिराच्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली.
समाजात संघाचा प्रभाव वाढतोय : होसबळे
संघ लोकांच्या हृदयात पोहोचत असून समाजातही संघाचा प्रभाव वाढत आहे, असे दत्तात्रेय होसबळे म्हणाले. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी अक्षता वितरण कार्यक्रमावेळी देशभरात लोकांनी आमचे उत्साहपूर्ण वातावरणात केलेल्या स्वागतातून देशातील वातावरण स्पष्टपणे दिसून आले. राम मंदिर हे भारताच्या सभ्यतेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. श्रीराम ही देशाची सभ्यता आहे, असे त्यांनी नमूद केले.









