विविध कार्यक्रम : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ’चा गजर
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात शनिवारी दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळपासून दत्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची वर्दळ वाढली होती. दत्त जयंतीनिमित्त मंदिरे फुलून गेली होती. त्याबरोबरच मंदिरात ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा गजरही झाला. विशेषत: सकाळी अभिषेक, पूजा, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, जन्मोत्सव सोहळा, आरती, भजन, कीर्तन, पाळणा, मंत्रपुष्प, जागर झाला.
शहरातील मारुती गल्ली, गोंधळी गल्ली, शहापूर मीरापूर गल्ली, आनंदनगर वडगाव, माधवपूर वडगाव, शांतीनगर टिळकवाडी, कलमेश्वर गल्ली अनगोळ, कपिलेश्वर मंदिर, कामत गल्ली दत्त मंदिर, दत्त गल्ली वडगाव, शहापूर महात्मा फुले रोड येथील दत्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
वडगाव दत्त मंदिर
वडगाव दत्त मंदिर येथे दत्त जयंतीनिमित्त शुक्रवारी पालखी सोहळा झाला. भजनी मंडळ, पंच मंडळी, कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.
मीरापूर गल्ली शहापूर
मीरापूर गल्ली शहापूर येथील दत्त मंदिरात शनिवारी पहाटे काकड आरती, त्यानंतर महाअभिषेक व दत्त आरती करण्यात आली. त्याबरोबरच सकाळी दत्त महाराजांची दिंडी काढण्यात आली. दुपारी 3 ते 5 या वेळेत हरिपाठ तर सायंकाळी 7 वाजता पाळणा, महाआरती तर सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
महात्मा फुले रोड, शहापूर
महात्मा फुले रोड शहापूर येथील श्री दत्त मंदिर सेवा प्रतिष्ठानतर्फे दत्त जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी महाअभिषेक, सायंकाळी दत्तगुरुंचा पाळणा आणि रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. बुधवारी दत्त जयंती वर्धापन दिनानिमित्त सकाळी 7 वाजता अभिषेक, सायंकाळी श्री दत्त पूजा तर गुरुवारी सकाळी श्री स्वामी याग व दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
केळकर बाग
केळकर बाग येथील दत्त मंदिरात शुक्रवारी सकाळी रुद्राभिषेक व यज्ञ झाला. सायंकाळी 7 ते 9 पालखी सोहळा झाला. शनिवारी सकाळी 8 वाजता अभिषेक, आरती व जन्मोत्सव पार पडला. रविवारी सकाळी महापूजा, दुपारी 1.30 ते 3.30 या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
कडोलकर गल्ली
कडोलकर गल्ली येथील दत्त मंदिरात शनिवारी दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सकाळी 10 ते 12 या वेळेत अभिषेक, महारुद्राभिषेक तर दुपारी 4 ते 6 या वेळेत दत्त संप्रदाय भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम तर सायंकाळी 6 वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा झाला. त्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले.
गोंधळी गल्ली
गोंधळी गल्ली येथील दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त सकाळी पूजा, अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी महाआरती व पाळणा झाला. त्यानंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.









