न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही
बेळगाव : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून प्रकरणातील संशयित आरोपी चित्रपट अभिनेता दर्शनचा साथीदार प्रदोषला गुरुवारी पुन्हा बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात हलवण्यात आले. न्यायालयाच्या सूचनेवरून कारागृह प्रशासनाने गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात त्याला बेंगळूरला हलवले. प्रदोष राव (वय 40) याला न्यायालयाच्या आदेशावरून 28 ऑगस्ट रोजी बेंगळूर येथील परप्पन अग्रहारमधून हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते. दर्शन व त्याच्या साथीदारांची कारागृहात बडदास्त ठेवल्यासंबंधीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होताच न्यायालयाची परवानगी घेऊन दर्शन व त्याच्या सर्व साथीदारांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात हलवण्यात आले होते. प्रदोषला हिंडलगा कारागृहात ठेवण्यात आले होते. आपल्याला परत बेंगळूर कारागृहात हलवावे, यासाठी प्रदोषच्या वकिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न यांनी ही याचिका मान्य करून प्रदोषला बेळगावहून बेंगळूरला हलवण्यासाठी परवानगी दिली होती. न्यायालयाच्या आदेशावरून गुरुवारी त्याला बेंगळूरला नेण्यात आले.









