वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत सोमवारी येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज आणि यजमान रॉयल्स चॅलेंजर बेंगळूर यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. दक्षिणेकडील या दोन संघातील सदर्न डर्बीची लढत शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीची अपेक्षीत आहे. मात्र चेन्नईचा कर्णधार धोनी आपल्या तंदुरुस्तीवर अधिक भर देत आहे. चेन्नईच्या फलंदाजांना या सामन्यात विजयासाठी सुधारित फलंदाजीची आवश्यकता आहे.
बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर शौकिनांना ही लढत खरोखरच पर्वणी ठरेल. या दोन संघामध्ये आतापर्यंत झालेल्या लढतीमध्ये चढ-उतार सातत्याने पाहावयास मिळाले. आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच धोनीला गुडघा दुखापतीची समस्या जाणवत असल्याने त्याला आपल्या तंदुरुस्तीवर अधिक भर द्यावा लागेल. आतापर्यंत चालू वर्षाच्या आयपीएल स्पर्धेत कर्णधार धोनीने आतापर्यंत चारही सामन्यात तंदुरुस्तीची समस्या असूनही आपला सहभाग दर्शवला आहे. सोमवारच्या सामन्यात चेन्नईचे नेतृत्व पुन्हा धोनीच करेल अशी अपेक्षा या संघाचे सीईओ के. विश्वनाथन यांनी व्यक्त केली आहे. चालू आठवड्याच्या प्रारंभी चेन्नईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपरकिंग्जला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात धोनीला गुडघा दुखापतीच्या वेदना जाणवत असल्याचे दिसून आले. दरम्यान धोनीने आठव्या स्थानावर फलंदाजी केली होती.
चेन्नई संघातील ऋतुराज गायकवाड आणि कॉन्वे हे आपली कामगिरी चोख बजावत आहेत. आता अजिंक्य रहाणेलाही फलंदाजीचा सूर मिळाला असल्याने मधल्या फळीतील फलंदाजांना धावांची गती वाढवावी लागेल. अंबाती रायडू, शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांना धावांची गती वाढवता आलेली नाही. शिवम दुबे गेल्या चार सामन्यामध्ये फलंदाजीचा सूर मिळवण्यासाठी झगडत चेन्नईच्या गोलंदाजी विभागावर अधिक ताण पडत असल्याचे दिसून येते. दीपक चहर आणि सिसांदा मगाला हे गोलंदाज दुखापतीमुळे किमान दोन आठवडे या स्पर्धेतून बाहेर राहतील. या संघातील अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहिल.
या स्पर्धेत रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळूरला गेल्या शनिवारच्या सामन्यात विजयाची नितांत गरज होती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात बेंगळूरने आपल्या सांघिक कामगिरीवर विजय मिळवला. विराट कोहलीची फलंदाजी बहरत असल्याने त्याचा लाभ बेंगळूरला निश्चितच मिळत आहे. कर्णधार डु प्लेसिस आणि कोहली या सलामीच्या जोडीला सोमवारच्या सामन्यात चेन्नई संघातील गोलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्यासाठी डावपेचात बदल करावे लागतील. चेन्नई संघाप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघालाही मधल्या फळीतील फलंदाजांकडून म्हणावी तशी चांगली कामगिरी होत नसल्याची समस्या जाणवत आहे. ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल याने मात्र आपला स्ट्राईक रेट चांगलाच राखला आहे. शाहबाज अहमद आणि महिपाल लोमरोर यांनाही धावांची गती वाढवण्यावर भर द्यावा लागेल. या संघातील यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला मात्र फलंदाजीसाठी झगडावे लागत आहे. मोहमद सिराज, हर्षल पटेल, पार्नेल यांच्यावर बेंगळूर संघाच्या गोलंदाजीची भिस्त राहिल.
चेन्नई सुपरकिंग्स : एमएस धोनी (कर्णधार), कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, रायुडू, मोईन अली, स्टोक्स, जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसांदा मगाला, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, अभय मंडल, निशांत सिंधू, राजवर्धन हंगिरगेकर, मिचेल सँटेनर, शुभाम्शू सेनापती, सिमरजीत सिंग, पथिराना, थीक्ष्ना, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशीद आणि तुषार देशपांडे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फॅफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मोहमद सिराज, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, शहबाज अहमद, अनुज रावत, आकाशदीप, महिपाल लोमरोर, अॅलेन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेविड विली, वेन पार्नेल, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव आणि मिचेल ब्रेसवेल.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वाजता