कोल्हापूर: राज्यभरात भोंग्यावरून राजकारण तापलं असताना कोल्हापुरात मात्र सामाजिक सलोख्याचे दर्शन पाहायला मिळाले. जिल्ह्यात आज पहाटे सर्वत्र आजान व्यवस्थित पार पाडली. कोल्हापूर शहरात ३० मशिदीमध्ये तर जिल्ह्यात ४०० हून अधिक मशिदीत पहाटे ६ वाजता आजान झाली. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान रात्री मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, ज्या मशिदीसमोर भोंग्यावरुन आजान म्हटली जाईल, त्या मशिदीसमोर त्याच आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज महाराष्ट्रात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवला असून अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यातील राजकारणासह सामाजिक वातावरण बिघडले आहे. मात्र कोल्हापुरात सामाजिक सलोख्याचे दर्शन पाहायला मिळाले. कोल्हापूर पोलिसांनी ठिकठिकाणी मशिदीसमोर पोलीस बंदोबस्त तैनात केला असून आज पहाटेच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यात नियमित आणि सुरळीत पार पडली. अनेक ठिकाणी मशिदीसमोर पोलीस बंदोबस्त नसल्याचे देखील निदर्शनास आले. तसेच धार्मिक तेढ बिघडणार नाही याची देखील काळजी जिल्ह्यातील सामाजिक संघटना पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी घेतली आहे.









