महामेळाव्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणा, पोलिसांनी घेतले ताब्यात
बेळगाव : पोलिसांनी महामेळाव्याला परवानगी नाकारूनही महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा करण्याचा निर्धार केल्यामुळे पोलिसांची धास्ती वाढली होती. मराठी भाषिकांची वाढती ताकद लक्षात आल्याने सोमवारी महामेळाव्याला पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला. म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना धर्मवीर संभाजी चौकात दाखल होताच धरपकड करण्यात आली. गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही, परंतु मराठी बाण्याचे दर्शन म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. बेळगाववर आपला हक्क दाखवून देण्यासाठी कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये भरविले जाते. या अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिकांचा महामेळावा होतो.
मराठी भाषिकांना डिवचण्याचा हा एक प्रयत्न असल्याने महामेळाव्यातून जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न होतो. यावर्षी मध्यवर्ती म. ए. समितीने धर्मवीर संभाजी चौक येथे महामेळावा होणार असल्याचे जाहीर केले. परंतु, पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले. तसेच महामेळावा परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. गुन्हे दाखल होणार, याची कल्पना असतानाही म. ए. समितीचे शेकडो कार्यकर्ते धर्मवीर संभाजी चौक परिसरात दाखल झाले. या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना वाहनांनी एपीएमसी पोलीस स्थानकात नेण्यात आले. कार्यकर्त्यांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला होता. म. ए. समितीच्या धास्तीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे धर्मवीर संभाजी महाराज चौकाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सहभाग
सीमाप्रश्न ही एक चळवळ असल्याने मागील 67 वर्षांपासून अनेक कार्यकर्ते सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कार्यरत आहेत. उतरत्या वयातही सीमाप्रश्नाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असतो. सोमवारीही धर्मवीर संभाजी चौक परिसरात ज्येष्ठ कार्यकर्ते महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी जमा झाले होते. शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. म. ए. समितीकडून प्रत्येक वेळी टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसरात महामेळावा आयोजित करण्यात येत होता. परंतु, यावेळी धर्मवीर संभाजी चौकात महामेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. तरीदेखील म. ए. समिती कुठे महामेळावा घेईल, याची शाश्वती नसल्याने शहरातील प्रमुख उद्याने तसेच मैदानांवर पोलीस फौजफाटा होता. व्हॅक्सिन डेपो येथे तर सर्वच वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. याबरोबरच शिवाजी उद्यान, संभाजी उद्यान येथेही पोलीस तैनात करण्यात आले होते. सकाळी 10 वाजल्यापासून म. ए. समितीचे कार्यकर्ते धर्मवीर संभाजी चौक परिसरात दाखल होत होते.
काही कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना मज्जाव करून ताब्यात घेण्यात आले. आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या बस तसेच इतर वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलक आंदोलनस्थळी दाखल होताच त्यांना ताब्यात घेण्यात येत होते. मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, रणजित चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुसकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर, सरिता पाटील, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, युवा नेते शुभम शेळके, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, आर. एम. चौगुले, माजी नगरसेवक नेताजी जाधव, अॅड. अमर यळ्ळूरकर, प्रकाश शिरोळकर, बी. डी. मोहनगेकर, आर. के. पाटील, तालुका म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्ष राजू किणेकर, सागर सांगावकर, सचिन दळवी, अंकुश पाटील, मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर, भाऊ गडकरी, गणेश दड्डीकर, मदन बामणे, शिवाजी पाटील, श्रीकांत कदम, राजू पावले यांच्यासह कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
स्मशानामध्येही पोलिसांची उपस्थिती
म. ए. समितीच्या नेत्यामागून चक्क स्मशानामध्येही पोलिसांची उपस्थिती होती. सोमवारी रक्षाविसर्जनासाठी प्रकाश मरगाळे स्मशानामध्ये जाणार होते. घरापासून त्यांचा पाठलाग करत स्मशानामध्येही पोलीस पोहोचले. या घडलेल्या प्रकारामुळे नाराजीचा सूर उमटला.
समितीचे नेते नजरकैदेत
महामेळाव्याला मज्जाव करण्यासाठी पोलिसांनी रविवारी रात्रीपासूनच सुरुवात केली. ज्या ठिकाणी महामेळावा होण्याची शक्यता होती, अशा सर्व ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. म. ए. समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर सोमवारी सकाळपासून पोलिसांचा पहारा होता. अंकुश केसरकर, मालोजी अष्टेकर, शुभम शेळके यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.









