उत्तराखंडात भगवान शंकरांचे एक भव्य मंदीर आहे. ओंकारेश्वर मंदीर म्हणून ते प्रसिद्ध आहे. येथे वर्षभर हिमालयातील पाच केदारांचे दर्शन होते. हेच या देवालयाचे वेशिष्ठय़ आहे. याला पंचगद्दी स्थल असेही नाव आहे. येथे निसर्गाचा अद्भूत चत्मकार पहावयास मिळतो. त्यामुळे असंख्य भाविक येथे येतात. हे मंदीर उखीमठ नगर येथे असून या नगराची लोकसंख्या जवळपास 3 हजार इतकी आहे.
केदार ही भगवान शंकरांचीच रुपे आहेत. ज्यांना शरीरप्रकृतीच्या करणास्तव केदारनाथ, मध्ययेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ आणि बद्रीनाथ या पाच केदारांपैकी सर्वांचे दर्शन त्यांच्या स्थानी जाऊक करु शकत नाहीत, त्यांच्यासाठी या स्थानी या पाचही केदारांचे दर्शन एकाचवेळी घडते. या नगरात एकंदर 600 परिवार राहतात. नगराच्या मधोमधच हे ओंकारेश्वर मंदीर आहे. द्वापर युगात ते स्थापन झाले असे मानले जाते. प्रारंभी याचे नाव उषामठ असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होत होत ते उखामठ असे झाले. मुस्लीम आक्रमकांनी मध्ययुगात हे मंदीर नष्ट केले. मात्र, नंतरच्या काळात त्याची पुन्हा निर्मिती करण्यात आली. त्यामुळे सध्याचे मंदीर तुलनेने नवीन आहे. हे उत्तराखंडातील सर्वात विशाल मंदीर म्हणूनही प्रसिद्ध आहे. ते कत्युरी किंवा नागरी शैलीत निर्माण करण्यात आलेले आहे. केदारनाथाच्या यात्रेला गेलेले बव्हंशी भाविक या मंदीराचेही दर्शन घेतात.









