वार्ताहर /किणये
बेळगुंदी गावात बुधवारी दुर्गामाता दौडच्या चौथ्या दिवशी शेकडो धारकऱ्यांच्या उपस्थितीत दुर्गामाता दौड काढण्यात आली. या दौडच्या माध्यमातून गावातील नागरिकांमध्ये एकीचे दर्शन दिसून आले. बुधवारी अगदी उत्साहात गावात दुर्गामाता दौड झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून दौडला प्रारंभ झाला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन यल्लाप्पा ढेकोळकर व सुरेश चौगुले यांनी केले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा धारकऱ्यांनी दिल्या. त्यानंतर प्रसाद बोकडे व बेळगुंदी ग्राम पंचायत अध्यक्ष प्रताप सुतार यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. शस्त्रपूजन सूरज बेटगेरीकर, महेश पाटील व किशोर पाटील यांनी केले. निंगुली चव्हाण, ग्राम पंचायत उपाध्यक्षा गीता ढेकोळकर, सुमन गावडा यांनी आरती ओवाळून दौडची सुरुवात केली. या दौडमध्ये बालचमूंसह युवावर्ग व वडीलधारी मंडळींचाही लक्षणीय सहभाग दिसून आला. कलमेश्वर गल्ली, पाटील गल्ली, गावडे गल्ली, चव्हाट गल्ली, भरम गल्ली, राकसकोप रोड, मरगाई गल्ली, गणपत गल्ली याप्रमाणे दौड निघाली होती. दुर्गामाता दौडचे गावात प्रत्येक घरोघरी स्वागत करण्यात येत होते. या दौडमध्ये बेळगुंदीसह सोनोली, यळेबैल, राकसकोप, बोकनूर, कावळेवाडी, बिजगर्णी येथील धारकरी सहभागी झाले होते. धारकरी दौडप्रसंगी ‘भारत माता की जय’ अशा विविध घोषणा देत होते. तसेच ही दौड अगदी शिस्तबद्ध सुरू होती.









