वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉलिवूड सिनेजगतात ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेद्वारे चाहत्यांच्या हृदयात आपले विशेष स्थान निर्माण करणारे कलाकार डॅरेन केंट यांचे नुकतेच निधन झाले. दीर्घकाळापासून दुर्मिळ आजाराशी झुंज देत असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. या अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने हॉलिवूडप्रेमींना धक्का बसला असून सोशल मीडियावर अभिनेत्याला श्र्रद्धांजली वाहिली जात आहे. टॅलेंट एजन्सी, पॅरी डॉड असोसिएट्सनने अभिनेत्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डॅरेन केंट दीर्घ काळापासून ऑस्टियोपोरोसिस, त्वचा विकार आणि संधिवात यासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त होते. दुर्मिळ त्वचेचा विकार झाल्यामुळे केंटला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. तथापि, आपल्या दमदार अभिनयामुळे डॅरेन केंट हॉलिवूडप्रेमींच्या कायम स्मरणात राहणार आहेत.









