नेटवर्क शोधण्यासाठी कर्मचारी लॅपटॉप घेऊन पार्किंगमध्ये
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात नेटवर्कची समस्या उद्भवत असल्याने चक्क कर्मचाऱ्याला हातामध्ये लॅपटॉप घेऊन कार्यालयाबाहेर नेटवर्क शोधण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या प्रशासकीय कार्यालयातच जर नेटवर्कसाठी ही परिस्थिती असेल तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल, ही कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे जिल्हा प्रशासन या समस्येकडे लक्ष देणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आधारकार्डमधील दुरुस्तीसाठी पोस्ट ऑफिस, बेळगाव वन कार्यालय याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात एक सेवा केंद्र उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरील मजल्यावर आधार सेवा केंद्र सुरू आहे. इतर कोणत्याही ठिकाणी आधारकार्डमध्ये दुरुस्ती न झाल्यास नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागते. त्यामुळे दररोज या ठिकाणी आधार दुरुस्तीसाठी जिल्हाभरातील नागरिकांची गर्दी होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात नेटवर्कची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अनेकवेळा सर्व्हरडाऊन, तसेच नेटवर्क नसल्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. ज्या ठिकाणी आधार सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी नेटवर्क पोहोचण्यास अडथळे येत असल्यामुळे चक्क कर्मचाऱ्याला हातामध्ये लॅपटॉप घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील खुल्या जागेत जावे लागत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून ज्या नागरिकांना आधारकार्ड करायचे आहे, त्यांना घेऊन कर्मचारी वाहने पार्किंग करतात त्या ठिकाणी नेटवर्क शोधत येत आहेत.
संपूर्ण जिल्ह्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो त्या जिल्हाधिकारी कार्यालयातच दिव्याखाली अंधार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आधार सेवा केंद्रात नेटवर्कची योग्यरीतीने सोय करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









