पथदीप सुरू करण्याकडे रेल्वे खात्याचे दुर्लक्ष : कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचाही कानाडोळा
प्रतिनिधी / बेळगाव
दोनशे कोटीचा निधी खर्चून उभारलेल्या स्मार्ट रेल्वेस्थानकाचे उद्घाटन पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनावेळी विद्युत रोषणाई करण्यात आल्याने रेल्वेस्थानक झळाळले होते. मात्र पंतप्रधान माघारी परतताच रेल्वेस्थानकाचा परिसर अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. स्टेशनरोडवरील पथदीप बंद असल्याने अंधार होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कॅन्टोन्मेंट आणि रेल्वेप्रशासनाच्या अखत्यारित येणाऱ्या रेल्वेस्थानकाचा आणि येथील बसस्थानकाचा विकास करण्यात आला आहे. रेल्वेस्थानकाचे उद्घाटन पंतप्रधानाच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले. मात्र उद्घाटनानंतर हा परिसर अंधारमय बनला आहे. स्टेशन रोडवरील पथदीप सुरू करण्याकडे रेल्वे खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. पथदीप सुरू करण्यासाठी रेल्वे खात्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या पण रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. परिणामी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. रेल्वेगाड्यांची संख्या वाढविल्याने रात्री अपरात्रीदेखील रेल्वे प्रवासी या मार्गाने ये-जा करीत असतात. पण अंधार असल्याने चालत जाणाऱ्या प्रवाशांना भीतीच्या वातावरणात जावे लागते.
रेल्वेस्थानकासमोर उभारलेल्या बसस्थानकातील पथदीपदेखील गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहेत. कॅन्टोन्मेंटच्या अखत्यारित येणाऱ्या बसस्थानकाचा विकास केला पण देखभाल कोण करणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. बसस्थानकाच्या विकासासाठी कॅन्टोन्मेंटकडे निधी नव्हता. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करून बसस्थानकाचा विकास केला खरा, पण याची किंमत कॅन्टोन्मेंट बोर्डला नसल्याचे निदर्शनास आले आहे. आता बसस्थानकाच्या देखभालीकडेदेखील कॅन्टोन्मेंटने दुर्लक्ष केले आहे. पथदीप सुविधा बंद केल्याने संपूर्ण बसस्थानक परिसरात अंधार पसरला आहे. या अंधाराचा गैरफायदा घेत अवैध व्यवसाय सुरू आहेत. येथील गाळ्याचे वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे गाळ्याचा दुऊपयोग होत असल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे. पण कॅन्टोन्मेंटने याकडे दुर्लक्ष केले आहे. बसस्थानकातील पथदीपासह स्टेशन रोडवरील पथदीप सुरू करण्याची मागणी होत आहे.









