दापोली प्रतिनिधी
दापोली नगरपंचायतीमधील ५० कोटी रुपयांचे भ्रष्टाचार प्रकरण सध्या गाजत आहे. याप्रकरणी संशयित म्हणून तक्रार झालेल्या दीपक सावंत याची केवळ तालुक्यात नव्हे तर परदेशातदेखील मालमत्ता असून या सर्व मालमत्ता नगरपंचायतीमध्ये भ्रष्टाचार करून सावंत याने खरेदी केल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यामुळे अनेक तर्क-वितर्काना तोंड फुटले आहे.
दापोली नगरपंचायतीमध्ये सुरुवातीला दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार समोर आला. मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी दापोली पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली असता पोलीस याप्रकरणी चौकशी करत असताना संशयित म्हणून नाव देण्यात आलेला दापोली नगरपंचायतीचा लेखापाल दीपक सावंत याने दीड कोटी रुपये नगरपंचायतीकडे जमादेखील केल्याची माहिती सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र हे प्रकरण दीड कोटी रुपयांवर न थांबता याची व्याप्ती मागील वीस वर्षांपासून असल्याने हे प्रकरण 50 कोटी रुपयांच्या घरात जात असल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे. शिवाय संशयित सावंत याची दापोलीसह मुंबई व परदेशातदेखील मोठी स्थावर मालमत्ता असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दापोली शहरालगत असणाऱ्या म्हाळुंगे गावामध्ये कैक एकरावर त्याचे फार्महाऊस असून परदेशात त्याच्या सदनिका असल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे. यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.
या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन याप्रकरणी त्याला मदत करणारे आणखी हात आहेत का, याचा तपास होण्याची गरजदेखील माजी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनीदेखील हे भ्रष्टाचार प्रकरण निपटून काढण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. आता याकडे जिल्हाधिकारी कोणत्या भूमिकेतून पाहतात याकडे सर्व दापोलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे









