अवघी पंढरी विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमली आहे. संतांच्या पालख्या व रथ वाखरीत पोहोचले आणि राज्यात पावसाच्या अमृतधारांना प्रारंभ झाला आहे. गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठल-रखुमाईची विधीवत महापूजा करतील आणि लक्षावधी वारकरी पांडुरंगाचे निदान कळसाचे दर्शन घेऊन चंद्रभागेत स्नान करुन कृतकृत्य होतील. यंदा दर्शनासाठीचे व्हीआयपी पास बंद करण्यात आले आहेत आणि रांगेतून महापूजेच्या वेळी येणाऱ्या वारकऱ्यांचा सपत्नीक सत्कार मुख्यमंत्री करतात ही प्रथाही सुरु राहणार आहे. भागवत धर्माची, समरसतेची भेदाभेद अमंगळ ठरणारी आणि सद्आचाराची शिकवण देणारी भगवी भागवत धर्माची पताका उंच आहेच पण ती आषाढीच्या निमित्ताने पुन्हा उंचावली जाणार आहे. वारीची ही प्रथा फार जुनी आहे. देहूतून जगद्गुरु तुकाराम महाराज, आळंदीतून ज्ञानोबा माऊली यांच्या पालख्या निघतात. वाटेत या पालख्यात अनेक संतांच्या पालख्या सामील होतात. ज्ञानोबा-तुकोबाचा आणि विठ्ठल नामाचा घोष सुरु असतो. वाटेत भजने, कीर्तने जोडीला नाच-फुगड्या, उभी रिंगणे, गोल रिंगणे, निरास्थान, बारामतीजवळ शेळ्यामेंढ्यांचे रिंगण असे अनेक उपक्रम असतात. अबालवृद्ध सारे स्व-विसरुन या वारीत सहभागी झालेले असतात. महाराष्ट्र विठ्ठलमय होतो आणि सारे भेदाभेद मागे पडून अवघा महाराष्ट्र एकदिलाने, एकमताने विठ्ठलचरणी एकरुप होतो. यंदाही या अनुभवाची प्रचिती आली. या वारी सोहळ्यात सुमारे दहा ते पंधरा लाख वारकरी, विठ्ठलभक्त सहभागी असतात पण कुठेही चेंगराचेंगरी वा गैरसोय होत नाही आणि या सोहळ्याचे कोणाला निमंत्रण नसते वा कुणी व्यवस्थापक नसतो पण सुमारे महिनाभर आधीपासून जो तो आपली जबाबदारी सांभाळत आणि इतरांची सोय बघत हा वारी सोहळा यशस्वी करतो. त्यामुळे या सोहळ्याचा धनी प्रत्यक्ष पांडुरंगच आहे असे मानले जाते व शेकडो वर्ष हा सोहळा पारंपरिक प्रथेने, उत्साहाने व वाढत्या गर्दीने पार पडत आहे. वारीत हजारो, लाखो वारकरी चालत पंढरीच्या दिशेने कुच करत असतात. त्यांची सेवा करायला, त्यांची व्यवस्था करायला अनेक सेवाभावी संस्था, डॉक्टरची पथके, केशकर्तन चालक, अग्रेसर असतात. निर्मल वारीसाठीही काही संस्थांचा पुढाकार असतो. मुक्कामी होणाऱ्या कीर्तनामध्ये पंचक्रोशीतील लोक सहभागी असतात. एकूणच विठ्ठलभक्तीचा महासोहळा असतो. त्यानिमित्ताने पंढरपूरची बाजारपेठ, व्यापार खुलतो, उंचावतो आणि पंढरपूरचा डंका वाजतो. केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी वारीमार्ग सोयीचे व पर्यावरणपूरक करण्यासाठी गेली काही वर्षे पावले उचलली आहेत. याच जोडीला महाराष्ट्र शासनही पंढरपूर आणि वारी सोहळ्यासाठी चांगले निर्णय करत असते. यंदाही पंढरीच्या वारीसाठी अनेक रेल्वेगाड्या आणि एस.टी. बसेस सोडण्यात आल्या. यंदा पावसाने खूपच ओढ दिली. जून संपत आला तरी पाऊस नव्हता. धरणे, नद्या कोरड्या पडल्या. सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले होते. पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे कमी-जास्त आगमन झाले असून धरण, पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने आनंदी, आनंद आहे. हल्ली जेथे गर्दी तेथे राजकारण असे समीकरण दिसते आहे. एखाद्या सद्गुरुचा सन्मान असो, पंढरीची वारी असो अथवा दसरा-दिवाळीचा उत्सव राजकीय मंडळी गर्दीत आपले घोडे दामटतात मग त्यात काही आंदोलने घुसतात, काही मागण्या व प्रश्न रेटले जातात किंवा वारकऱ्यावर, भक्तांवर पुष्पवृष्टी केली जाते. वाटेत बॅनरबाजी केली जाते. यंदाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी या महागर्दीत आपले घोडे दामटले आहे. पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन ते पंढरपूर, तुळजापूरला गेले. त्यांनी महापूजा केली. भालकेंसह-अनेकांना भारत राष्ट्र समितीत प्रवेश दिला. राजू शेट्टी यांनाही त्यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. पण शेट्टी यांनी ती नाकारली. चंद्रशेखर राव यांनी ‘अबकी बार किसान सरकार’ अशी घोषणा दिली आहे. महाराष्ट्रात सभा सुरु केल्या आहेत. देशात अठरा पक्ष एकत्र करुन मोदी-शहा व भाजपाला रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असले तरी अंर्तविरोध आहे. पाटण्यात त्यांचेही दर्शन झाले आता भर म्हणजे बीआरएस सारखे पक्ष इतरत्र हातपाय पसरत आहेत आणि पाटण्यातील तथाकथित ऐक्य हे देशासाठी नाही तर मुलगा-मुलगी, नातवासाठी आहे. घराणेशाही चालवण्यासाठी आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी भ्रष्टाचाराचे व घराणेशाहीचे आरोप केले आहेत. खरे तर राजकीय दुकानदारी चालवायला अनेक व्यासपीठे आहेत. जनसामान्यांना त्याचा उबग आला आहे. तरीही ही मंडळी पंढरीच्या वारीत आपली घोडी घुसवण्याचा प्रयत्न करतात हे दुर्दैव आहे. वारकरी संप्रदायाने आणि विविध फड व दिंड्यांच्या मालकांनी याला प्रतिबंध घातला पाहिजे. पंढरपुरच्या देवस्थानबद्दल श्री सुब्रमण्यम स्वामी यांनी मध्यंतरी काही विधाने केली होती. देवस्थान, देऊळ, मूर्ती, मालमत्ता याबाबत नेहमीच काही वार्ता येत असतात. पण त्यापुढे जाऊन जीवन समृद्ध करणारे आणि समरसता रुचवणारे वारकरी संप्रदायाचे, भागवत धर्माचे तत्वज्ञान सर्वांनी स्वीकारले पाहिजे. यंदा आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आली आहे. यंदा मुस्लीम बांधव वारकऱ्यांची कशी सेवा करत आहेत यांच्या अनेक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल केल्या गेल्या. त्यामागेही राजकारण असेल तर ते योग्य नाही आणि सद्भाव असेल तर तो स्वागतार्ह आहे. एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी असेल तर पंढरपुरात त्या दिवशी बकऱ्यांचा बळी दिला जात नाही. दुसरे-तिसरे दिवशी कुर्बानी केली जाते, असे म्हणतात. हिंदू बहुसंख्य असलेल्या गावात, विभागातही असे पथ्य पाळले जाते. पण सर्वांना तसे भान नसते. मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी यंदा चांगल्या पावसाचे साकडे घालत पंढरपुरच्या नवीन आराखड्यासह अनेक गोष्टींना व सुखसोयींना चालना देतील अशी अपेक्षा आहे. पण सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आता स्वच्छ कारभाराची एकादशी करणे गरजेचे आहे. ना खाऊंगा ना खाने दुंगा हे ब्रीद सर्वांनी पाळले पाहिजे. पातळी घसरलेले राजकारण सावरण्यासाठी आणि राजकारणापेक्षा समाजकारण होण्यासाठी ते गरजेचे आहे. तूर्त पाऊस सुरु आहे आणि विठ्ठल नामाचा गजर सर्वत्र दुमदुमतो आहे.
Previous Articleफॉक्सकॉनचा वेदान्तासह सेमीकंडक्टर प्रकल्प वाढविण्यावर भर
Next Article भारत-थायलंड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








