संबंधित खात्याने गतिरोधक, सूचनाफलक-संरक्षक कठडा बांधण्याची मागणी
वार्ताहर /सांबरा
बेळगाव-बागलकोट मार्गावरील सांबरा गावच्या नजीकचे धोकादायक वळण अपघातामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. त्यामुळे संबंधित खात्याने त्याठिकाणी गतिरोधक बसवून सूचनाफलक लावावे व संरक्षक कठडाही बांधावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. बेळगाव-बागलकोट राज्यमार्ग असल्याने व सांबरा येथे विमानतळ असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. येथील धोकादायक वळणाचा बऱ्याचदा वाहनचालकांना लगेच अंदाज येत नाही. तसेच त्या ठिकाणी वळण असल्याचे एकही सूचनाफलक नाही किंवा रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठडे देखील नाहीत. त्यामुळे धोकादायक वळणावर वारंवार अपघात घडत आहेत. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी तर वाहन घेऊन जाणे म्हणजे धोक्याचे बनले आहे. मागील तीन-चार वर्षांमध्ये या ठिकाणी बरेच अपघात घडले आहेत. तरी संबंधित खात्याने या धोकादायक वळणावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गतिरोधक बसवावेत व संभाव्य अपघाताच्या घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांतून होत आहे.









