हटविण्याकडे दुर्लक्ष, वनखात्याला निवेदन
बेळगाव : हलगा सर्व्हिस मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी असलेला धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी करून देखील वनखात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तातडीने हा धोकादायक वृक्ष हटवून दिलासा द्यावा अशी मागणी उमेश हणमंताचे यांनी केली आहे. हलगा येथील सर्व्हिस मार्गावर हा धोकादायक वृक्ष आहे. सहा महिन्यापूर्वी वृक्ष हटविण्यासाठी ग्रा. पं. आणि वनखात्याला निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्याप या वृक्षाकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या वादळी पावसामुळे हा वृक्ष धोकादायक ठरू लागला आहे. येथील रहिवासी, पादचारी आणि वाहनधारकांना ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. मागील काही दिवसांपासून वादळी पावसामुळे झाडांची पडझड होऊ लागली आहे. त्यामुळे खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या वृक्षाच्या फांद्या शेजारी असलेल्या दुकान आणि घरांवर झुकल्या आहेत. त्यामुळे वादळी वाऱ्यात त्या धोकादायक ठरू लागल्या आहेत. शिवाय वृक्षही एका बाजूला झुकला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेला हा धोकादायक वृक्ष हटवावा अशी मागणी केली आहे.









