कॅन्टोन्मेंटने लक्ष देण्याची गरज
बेळगाव : मिलिटरी महादेव मंदिरानजीक झाडांच्या फांद्या केव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. एखाद्यावेळी वाहनावर अथवा पादचाऱ्यावर झाडाची फांदी कोसळल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट प्रशासनाने या धोकादायक फांद्या हटवाव्यात, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे. मिलिटरी महादेव मंदिरापासून कॅम्पकडे जाणाऱ्या रस्त्यालगत झाडांच्या फांद्या लोंबकळत आहेत मोठी झाडे असल्यामुळे झाडांच्या फांद्या मोठ्या आहेत. आठवडाभरापूर्वी झालेल्या वारा-पावसामुळे काही फांद्या जमिनीलगत आल्या आहेत. मोठ्या वाहनांना या फांद्या अडकत असून धोका निर्माण झाला आहे. या परिसरात उद्यान तसेच हॉटेल असल्यामुळे नागरिकांची नेहमी ये-जा असते. त्यामुळे कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी फांद्या हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.









