क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक : शाळकरी मुलांना धोका
बेळगाव : साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाल्याने विविध मार्गावर उसाची वाहतूक सुरू आहे. विशेषत: क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक शाळकरी मुलांसह वाहनधारकांनाही धोकादायक ठरू लागली आहे. विशेषत: सकाळी व सायंकाळी अधिक ऊस वाहतूक होत असल्याने मुलांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. बेळगाव-वेंगुर्ला, बेळगाव-राकसकोप, बेळगाव-पिरनवाडी, बेळगाव-हंदिगनूर मार्गावर ही धोकादायक ऊस वाहतूक सुरू आहे. ही वाहने मार्गावरील बसथांब्यांवर किंवा शाळेसमोरच थांबविली जात आहेत. दरम्यान, ऊस खाण्यासाठी शाळकरी मुले या वाहनांवर लोंबकळताना दिसत आहेत. चंदगड तालुक्यातील राजगोळी, हलकर्णी आणि म्हाळुंगे साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक होऊ लागली आहे. या मार्गावरच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरचा धोका अधिक आहे. रात्रीही ऊस वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. काही वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून अनेकांचा बळी गेला आहे. मात्र ही धोकादायक वाहतूक सुरू आहे. पोलीस खात्याने या वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणीही होत आहे.
क्षमतेपेक्षा अधिक भरणा
ट्रक व ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक उसाचा भरणा केला जात आहे. त्यामुळे चढतीला ट्रॅक्टरच्या समोरची दोन्ही चाके अधांतरी जाताना दिसत आहेत. त्यामुळे धोका निर्माण होऊ लागला आहे. गतिरोधकावर क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर कलंडण्याचे प्रकार वाढले आहेत.









