वाहनधारकांची मागणी : विविध मार्गांवर ट्रॅक्टरमधून धोकादायक ऊस वाहतूक
बेळगाव : क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणारी वाहने धोकादायक ठरू लागली आहेत. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाल्याने ऊस वाहतूक वाढली आहे. त्यामुळे इतर वाहनांना या वाहतुकीचा धोका निर्माण होऊ लागला आहे. ट्रॅक्टर, ट्रकचालकांकडून धोकादायक वाहने हाकली जात आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने समज द्यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. बेळगाव परिसरातील उसाची वाहतूक चंदगड तालुक्यातील राजगोळी, हलकर्णी आणि म्हाळुंगे साखर कारखान्याकडे होऊ लागली आहे. त्याचबरोबर काही ऊस इतर तालुक्यातही जाऊ लागला आहे. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक ऊस ट्रॅक्टरमध्ये भरला जात असल्याने इतर वाहनांना धोका निर्माण होऊ लागला आहे. डबल ट्रॅालीच्या माध्यमातून उसाची वाहतूक केली जाते. चढतीला ट्रॅक्टरची दोन्ही चाके हवेतच असतात. त्यामुळे ट्रॉली कलंडण्याचे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. शिवाय रात्रीच्या अंधारात ही वाहतूक केली जात असल्याने अपघात वाढू लागले आहेत. काही वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
शाळांजवळ वाहने थांबवू नयेत
विशेषत: गावाजवळ किंवा शाळेसमोरच उसाचे ट्रॅक्टर थांबविले जात आहेत. दरम्यान, लहान मुले ऊस खाण्यासाठी ट्रॉलीच्या पाठीमागे लोंबकळताना दिसून येत आहेत. यापूर्वी उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक गावाजवळ आणि शाळेजवळ थांबवू नयेत, अशी मागणीही होत आहे.









