प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून संपूर्ण शहर स्मार्ट बनल्याचा दावा केला जातो. मात्र, शहराच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना खड्डेमय धोकादायक रस्त्यांवरून ये-जा करण्याची वेळ आली आहे. जुन्या धारवाड रोडवर ठिकठिकाणी निर्माण झालेले खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत.
शहरात प्रवेश करणाऱया प्रमुख रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच जुन्या धारवाड रोडचे काँक्रिटीकरण लेंडी नाल्यापर्यंत करण्यात आले आहे. त्यापुढे जुन्या धारवाड रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. त्यामुळे हुबळी, धारवाड, बेंगळूरहून येणारे वाहनधारक या मार्गाने शहरात प्रवेश करतात. मात्र या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी ड्रेनेज वाहिन्यांसाठी खोदाई करण्यात आली होती. सदर चरी व्यवस्थित बुजविण्यात आल्या नसल्याने मोठे खड्डे बनले आहेत. या ठिकाणी वाहनधारकांना अडचण निर्माण होत असून अपघातास कारणीभूत ठरत आहेत. लेंडीनाला ते जुने बेळगाव नाक्मयापर्यंतच्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून, याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हे खड्डे बुजविण्याची मागणी जनतेतून होत आहे.









