मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य संघटनेचा स्तुत्य उपक्रम
वार्ताहर/हिंडलगा
मार्कंडेय नदी पुलाजवळील मण्णूर व आंबेवाडी गावाकडे जाणाऱ्या जोडरस्त्यावर धोकादायक खड्डे निर्माण झाले होते. दोन दिवसांच्या पावसामुळे या खड्ड्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी व चिखल निर्माण झाला होता. यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांना अत्यंत धोका निर्माण झाला होता. पाणी रस्त्यावरच तुंबून राहिल्याने पादचाऱ्यांना देखील त्रासदायक होत होता. याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य संघटनेमार्फत हे सर्व खड्डे माती टाकून बुजविले व पाण्याला वाट करून दिली. त्यामुळे होणारे अपघात टळले. या संघटनेचे यल्लाप्पा कदम, गजानन शहापूरकर, तानाजी तरळे, नागेश चौगुले, बाळू आनंदाचे या कार्यकर्त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी, तसेच ट्रक्स, डंपर यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. वेळीच खड्डे बुजवल्याने होणारे धोके टळले आहेत.









