जांबोटी-कुसमळी भागातील तरुणांनी घेतले परिश्रम
बैलूर : बेळगाव-जांबोटी मार्गावरील जांबोटीजवळ धोकादायक खड्डा पडला होता. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे कठीण झाले होते. हा रस्ता बेळगाव व गोव्याला चोर्लाघाटमार्गे जोडणारा महामार्ग असल्याने भरधाव गाड्या ये-जा करत असतात. हा खड्डा मोठा व लांबून वाहनचालकांना समजून येत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. जांबोटी-कुसमळी भागातील तरुणांनी एकत्र येऊन श्रमदानातून हा खड्डा बुजवला. हा खड्डा चुकविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. खड्डा दुरुस्त केल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. हा खड्डा बुजवण्यासाठी अनंत सावंत, विजय दळवी, बाबुराव पाटील, सुभाष बसर्गे, विकास कर्लेकर, निखिल सुतार, यल्लाप्पा पाटील, प्रशांत मिसाळे, शाम पाटील या तरुणांनी परिश्रम घेतले. पावसाळा सुरू झाल्याने या भागातील निसर्ग बहरला आहे. तसेच अनेक धबधबे प्रवाहीत झाल्याने पर्यटकांना साद घालत आहेत. तसेच बेळगावहून गोव्याला चोर्लामार्गे ये-जा करणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने प्रवास करत असल्याने या मार्गावरील वर्दळ वाढली आहे. रस्ता ठिकठिकाणी खराब झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तरी हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.