वार्ताहर /दाभाळ
निरंकाल ते बेतोडा दरम्यान भूमीगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याच्या मधोमध खोदलेले चर कंत्राटदाराने व्यवस्थित न बुजविल्याने वाहनचालकांना ते धोकादायक ठरत आहेत. नुसते दगड माती घालून बुजविण्यात आलेल्या या चरातील माती पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे. काँक्रीट किंवा डांबर घालून ते व्यवस्थित बुजविणे आवश्यक होते. सध्या या चरांमुळे वाहनचालकांना धक्के खावे लागत आहे. बऱ्याचवेळी दुचाकी चालकांना त्यांचा अंदाज येत नाही. रात्रीच्यावेळी तर दुचाकीवरील तोल जाऊन अपघात होण्याचा वाढता धोका आहे. या मार्गावरून दिवसाकाठी मोठ्या प्रमाणात रहदारी होत असून महिला तसेच शाळकरी मुलांना ने-आण करण्यासाठीही पालक नियमित फोंड्याकडे ये-जा करतात. त्यामुळे सर्वांनाच या चरांमुळे धोका असून संबंधित कंत्राटदाराने हे चर व्यवस्थित बुजवून टाकण्याची मागणी केली जात आहे.









