मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे राष्ट्रपतींना पत्र
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी रविवारी राज्यपाल आर.एन. रवि यांना हटविण्याची मागणी करणारे पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. राज्यपाल जेव्हा राजकारणी होतो, तेव्हा त्याने पदावर राहू नये असे स्टॅलिन यांनी पत्रात म्हटले आहे. राज्यपाल हे सांप्रदायिक द्वेषाला खतपाणी घालत आहेत. तसेच ते तामिळनाडूच्या शांततेसाठी धोकादायक असल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.
मुख्यमंत्री स्टॅलिन हे राज्यपालांवर नाराज आहेत. राज्यपालांनी घटनेचे कलम 159 अंतर्गत घेतलेल्या पदाच्या शपथेचे वारंवार उल्लंघन केले आहे. राज्यपालांनी विधानसभेत संमत विधेयकांना मंजुरी देण्यास विलंब केला. तसेच अण्णाद्रमुकच्या माजी मंत्र्यांच्या विरोधात कारवाई करण्याची अनुमती दिलेली नाही. निवडून आलेल्या सरकारच्या विचारसरणीच्या विरोधात राज्यपाल काम करत असल्याचे स्टॅलिन यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.
नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनीही राज्यपाल म्हणून रवि यांचा कार्यकाळ समाधानकारक नव्हता असे मान्य केले होते असे स्टॅलिन म्हणाले. रवि हे तामिळनाडूपूर्वी नागालँड आणि मेघालयाचे राज्यपाल राहिले आहेत.
माझ्या सहमतीशिवाय राज्यपालांनी मंत्री सेंथिल बालाजी यांना पदावरून हटविले होते. राज्यपालांची ही कृती घटनाविरोधी होती. त्यांच्या या पावलामुळे त्यांचा राजकीय ओढा स्पष्ट होतो असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.









