ड्रेनेजवर झाकण घालण्याकडे मनपाचे दुर्लक्ष : नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
बेळगाव : कपिलेश्वर कॉलनी येथील भातकांडे शाळेसमोरील रोडवर दोन ठिकाणी ड्रेनेज चेंबरचे झाकण खराब झाल्याने झाकणाअभावी ड्रेनेज खुले झाले आहे. तरीदेखील ड्रेनेजवर झाकण घालण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना हा रस्ता धोकादायक बनला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने खुल्या ड्रेनेज चेंबरवर झाकणे घालण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे.
सध्या पावसामुळे शहर व उपनगरातील डांबरी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्याचबरोबर ड्रेनेज, गटारींचीदेखील बिकट परिस्थिती झाल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या असल्या तरीदेखील त्या सोडविण्याकडे मात्र महापालिकेने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. कपिलेश्वर कॉलनी येथील भातकांडे शाळेसमोरील रोडवरून दररोज मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने या ना त्या कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे.
या मार्गावरील ड्रेनेज चेंबरवरील दोन झाकणे पूर्णपणे खराब झाली आहेत. झाकणाअभावी ड्रेनेज चेंबर उघडी असल्याने येथून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांना व नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. याबाबतची कल्पना स्थानिकांनी महापालिकेला अनेकवेळा दिली आहे. तरीदेखील ड्रेनेजवर झाकण बसविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.









