राची :
पाकिस्तानात एका धोकादायक विषाणूची एंट्री झाली आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील दोघेजण खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तर एक कराची येथील आहे.
सिंधमधील इब्राहिम हैदरी येथील रहिवासी 25 वर्षीय मच्छिमाराचा कांगो विषाणूच्या संक्रमणामुळे मृत्यू झाला. तर खैबर पख्तूनख्वा येथे करक आणि उत्तर वजीरिस्तानात कांगो विषाणूच्या संक्रमणामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मालिर जिल्ह्यातील रहिवासी मुहम्मद जुबैरला सर्वप्रथम 16 जून रोजी तीव्र ताप, स्नायूदुखी, पोटात वेदना, खोकला, रक्तस्राव व चक्कर येणे यासारखी लक्षणे जाणवली. डॉक्टरांना विषाणू संक्रमणाचा संशय वाटल्याने त्याला सिंध येथील रुग्णालयात हलविले, जेथे त्याचा मृत्यू झाला आहे. मृत इसमाच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटविली जातेय. कांगो संक्रमण झालेल्या आणखी तीन रुग्णांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार केले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.









