सातारा :
कोकणातील मोठ्या नद्यापैकी सावित्री नदीवरील मोठा पुल ऑगस्ट २०१६ च्या रात्री वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी महाराष्ट्रभर खळबळ उडाली होती. तेव्हाही राज्यातील जुने पुलं चर्चेत आले होते. त्या घटनेनंतर अनेक पुलांची तात्पुरती डागडुजीही झाली. त्यानंतर कालच्या इंद्रायणी पुलाच्या दुर्घटनेनंतर धोकादायक पुलांची आठवण राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना बांधकाम विभागांना दिल्या आहेत. साताऱ्यात सुद्धा ब्रिटीशकालीन पुल आहेत. त्या जागी नवीन पुल बांधण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.
काल इंद्रायणी पुल पडल्यानंतर प्रशासन व राज्यातील जनतेच्या नजरा जुन्या धोकादायक पुलांकडे वळल्या गेल्या आहेत. यापूर्वीही ऑगस्ट २०१६ मध्ये सावित्री नदीवरील पुल पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी ती काळरात्र ठरली होती. एक बसही वाहून गेली होती. त्यानंतर पुलांची चर्चा राज्यभर झाली होती. त्यानंतर राज्यभरातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले ोते. आताही राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लगेच माहिती घेवून राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यात वडूथ, देऊर, संगम माहुली, वाढे, वर्ये हे जुने पुल आहेत. त्यातील काही पुल धोकादायक असल्याचे स्थानिक सांगतात. जिल्ह्यात ब्रिटीशकालीन पुल आणि नवीन पुल आहेत. त्यात जुन्या पुलांबाबत बांधकाम विभागाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पाहणी करुन धोकादायक असल्यास त्यावरुन वाहतूक थांबवली जाते. तर जे धोकादायक पुल नाहीत असा अहवाल असल्यास तो वाहतुकीला खुला करण्यात येतो, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
- उपमुख्यमंत्र्यांना त्याच प्रश्नांवरुन घेरले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी त्याच प्रश्नांवरुन घेरले. त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना पुन्हा जे दरे येथे सांगितले तेच उत्तर दिले. ते म्हणाले, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. इंद्रायणी पुलाबाबतची घटना दुर्दैवी आहे. पुल तो जुना होता. वाहतुकीसाठी बंद होता. तरीही त्या पुलावर पर्यटक मोठ्या संख्येने गेल्याने हा प्रकार घडला. पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी उत्तर दिले.
- संगम माहुलीचा पूल पडण्याची प्रशासन वाट पाहतेय का ?
संगममाहुलीच्या पुलाला ११० वर्ष झाली आहेत. ब्रिटीशांनी बांधलेला हा पुल मुदतबाह्य झाल्याचे पत्रही इंग्लडवरुन आलेले आहेत. वेळेत पाडला नाही. तर दुर्घटना घडू शकते. त्या पुलाला पर्यायी पुल म्हणून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी टेंडर सुमारे चार वर्षापूर्वीच काढण्यात आले. पुलाचे काम सुद्धा सुरू झाले आहे. मात्र काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून ३ वर्षात फक्त १ च पिलर उभे झाला आहे. असेच काम धिम्या गतीने झाले तर पुलाचे पूर्ण काम होण्यासाठी अजून ५-१० वर्ष लागतील. प्रशासनाने प्राधान्य देऊन माहुली येथील पुलाचे बांधकाम करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून लवकरात लवकर आणि दर्जेदार काम कसे होईल याची जबाबदारी घेतली पाहिजे, पालकमंत्री आहेत, कोरेगावचे आमदार आहेत. खासदार आहेत यांनी लक्ष घालून लवकर पुल उभारावा, अशी विनंती श्री बालाजी ट्रस्ट साताराचे राजेंद्र चोरगे यांनी केली आहे.








