वाहनधारकांना धोका : चर बुजविण्याची मागणी
खानापूर : करंबळ-चापगाव रस्त्यावर कारलगा जोड रस्त्याजवळील चापगाव-करंबळ रस्त्यावर मधोमध आडवी खोल चर पडल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसात अनेकवेळा चर दिसून येत नसल्याने वाहनधारकांना चरीमुळे धोका पत्करावा लागत आहे. ही चर तातडीने बुजविण्यात यावी, अशी मागणी प्रवासी आणि आसपासच्या गावच्या नागरिकांतून होत आहे. तीन वर्षांपूर्वी करंबळ-चापगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र अवघ्या तीन वर्षांत रस्त्यावरील खडी उखडल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. आणि वाहतुकीस रस्ता धोकादायक बनला होता. मे महिन्यात या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आले होते.
मात्र लगेच पावसाळा सुरू झाल्याने पुन्हा या रस्त्यावरील खडी वर आलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडणार असल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत आहे. तसेच चापगावजवळील कारलगा गावाला जाणाऱ्या रस्त्याजवळ मधोमध आडवी मोठी चर पडलेली आहे. त्यामुळे ही चर दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांच्या लक्षात येत नसल्याने वाहनांना मोठा धक्का बसत आहे. त्यामुळे अनेकवेळा दुचाकीस्वारांची वाहने कलंडलेली आहेत. तसेच वाहनांना धोकाही निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून चापगाव, कोडचवाड, वड्डेबैल यासह इतर गावांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने ही चर बुजवावी, अशी मागणी होत आहे.









