महापौरांना शेतकऱ्यांनी दिले निवेदन : राष्ट्रीय महामार्गाचे पाईप साफ करण्याची मागणी
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गाला लेंडी नाल्यावर घालण्यात आलेले पाईप पूर्णपणे बुजले आहेत. त्या ठिकाणी काही प्लॉटधारकांनी मोठ्या प्रमाणात माती टाकली आहे. त्यामुळे जवळपास शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. शेतकरी तर पूर्णपणे बुडाला आहे. मात्र वेळीच सावध व्हा अन्यथा संपूर्ण शहराला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने त्या पाईपची सफाई करा अन्यथा साऱ्यांनाच त्याचे चटके बसणार, असा इशारा शेतकऱ्यांनी महापौर शोभा सोमणाचे यांना निवेदन देवून दिला आहे. राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करताना लेंडी नाला आणि बळ्ळारी नाल्याचे पाईप पूर्वेकडील बाजूला जाण्यासाठी 16 पाईप घालण्यात आले आहेत. मात्र हे संपूर्ण पाईप बुजले आहेत. या पाईपची सफाई करावी यासाठी बेळगाव शेतकरी संघटनेने गेल्या चार वर्षांपासून वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र त्यांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळेच 2019-20 मध्ये शहराला पुराचा फटका बसला होता. तरी देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता लेंडी नाला परिसरातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली जाऊन जमिनीतील पीक पूर्णपणे कुजण्याची शक्यता आहे.
वेळीच सावध होण्याची गरज
लेंडी नाल्याची सफाई करणे गरजेचे होते. मात्र सफाईही केली नाही. सध्या या नाल्यामध्ये झाड कोसळले आहे. ते झाड काढणे देखील कठीण झाले आहे. समर्थनगरपर्यंत पाणी साचून राहात आहे. जर अधिक पाऊस झाला तर पूर्ण शहराला पाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा व तातडीने त्या पाईपची स्वच्छता करा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
प्लॉटधारकांवर कारवाई करणे गरजेचे
काही प्लॉटधारकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती टाकली आहे. त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत माळमारुती पोलीस स्थानकामध्ये फिर्याद देण्यासाठी गेले असता फिर्याद दाखल करून घेतली नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उद्धट उत्तरे दिली गेली आहेत. तेव्हा जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनीही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.









